सरकारला सल्ला देऊ नका, आमच्यात नैतिकता:’सध्यातरी धनंजय मुंडेंचा राजीनामा नाहीच’; अजित पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला

बीड हत्या प्रकरणात कुणाचा संबंध असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई करू. या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. सध्या माध्यमांतून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणीची चर्चा सुरु आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही माझ्याकडे काही कागदपत्रे दिली आहेत. त्यात तथ्य आढळल्यास कारवाई नक्की करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे. जो दोषी असेल त्याला पाठीशी घातले जाणार नाही. त्याच्यावर कारवाई होईलच, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आणि जर कोणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही कागदपत्र माझ्याकडे दिली आहेत. मी ती कागदपत्रे पाहिली आहेत. ती कागदपत्र तपासणीसाठी मी संबंधित यंत्रणांना दिली आहे. त्यामध्ये काही दोष आढळला तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल, असे देखील पवार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी 30 जानेवारी रोजी बीड जिल्ह्यात जाणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते डीपीडीसीची बैठक घेणार आहेत. या विषयी देखील त्यांनी मााहिती दिली. सरकारला सल्ला देऊ नका, आमच्यात नैतिकता महायुतीमधील सर्व वरीष्ठ नेत्यांशी मी संपर्कात आहे. त्यामुळे खालचे कार्यकर्ते काय बोलतात, त्यावर उत्तर देण्यास मी बांधील नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारला इतरांनी कोणीही सल्ला देऊ नये. महायुती सरकारमध्ये नैतिकता आहे, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी वारंवार मागणी होत आहे. या मागणीला अजित पवार यांनी फेटाळले आहे. निर्दोष व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायला नको, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. सुरेश धस यांच्या आरोपाला उत्तर देण्यास नकार भारतीय जनता पक्षाच्या ज्यांना मी नेते समजतो, त्या सर्वांशी माझी चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपाला फेटाळले आहे. खालच्या पातळीवर पक्षाचे कार्यकर्ते काय बोलतात, याला उत्तर देण्यास मी बांधील नाही. मात्र वरिष्ठ पातळीवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जेपी नड्डा यांच्याशी माझी वारंवार चर्चा होत असते. आजही मुख्यमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली असल्याचे अजित पवार यांनी सांगितला आहे. अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरि बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहे. सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.