नजीकच्या दिवसात निर्माता-दिग्दर्शक परितोष पेंटरनं विविध धाटणीच्या सात मराठी सिनेमांची घोषणा केली. पण दुसरीकडे लेखकांमध्ये काहीशी कुजबुजदेखील यानिमित्तानं सुरू झाली. ‘फक्त महिलांसाठी’ या चित्रपटाविषयी पडद्यामागील काही गोष्टी उघड झाल्या आहेत. नुकत्याच घोषणा झालेल्या ‘फक्त महिलांसाठी’ या सिनेमावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. लेखिका शिल्पा नवलकर यांच्या एका मेसेजवरून हा प्रकार समोर आला आहे. ‘२०१५ साली मी लिहिलेलं ‘सेल्फी’ हे मराठी नाटक रंगभूमीवर आलं. ते हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये परितोष पेंटर या निर्मात्यानं सादर केलं. सेल्फी या नाटकावर सिनेमा करण्याची परितोषची इच्छा होती. पण, हा सिनेमाचा विषय नाही असं मी त्याला म्हणाले होते’, अशा आशयाने सुरुवात होणारा मजकूर लेखिका नवलकर यांनी ‘मानाचि’ या लेखक संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला.

नाटकावर सिनेमा नको

शिल्पा सांगतात; ‘जून २०२२मध्ये ‘सेल्फी’ या नाटकावर सिनेमा करायला मी सुरुवातीला नकार दिला होता. पण परितोष चित्रपट करण्याबद्दल ठाम होता. अखेर मी आनंदाने सिनेमाची पटकथा लिहिण्यास होकार दिला. आपल्याला नाटकाचा गाभा तोच ठेवून सिनेमासाठी वेगळी कथा बांधावी लागेल, असं मी त्याला सांगितलं. आमचं दोघांचं बोलणं झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून मृणाल कुलकर्णीची निवड झाली. सहलेखकासाठी मी स्वतः विराजस कुलकर्णीचं नाव सुचवलं. तिसरी मीटिंग झाल्यानंतर कथा बांधायला सुरुवात करायची असं ठरलं. त्यानंतर मला परितोषकडून एकही फोन आला नाही आणि दोन दिवसांपूर्वी मला थेट ‘फक्त महिलांसाठी’ या सिनेमाविषयी समजलं.

क्षमस्व; कळवायचं राहीलं – परितोष पेंटर, निर्माता

महिलांवर आधारित सिनेमा करण्यासाठी मी सुरुवातीला शिल्पा यांच्याकडे ‘सेल्फी’ या नाटकाचा सिनेमा करण्याबाबत विचारणा केली. त्यांच्याशी बोलल्यानंतर मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी ऑन बोर्ड आले. त्यावेळी शिल्पा इतर कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे सिनेमासाठी पूर्ण वेळ देऊ शकणार नाहीत असं वाटलं. दरम्यान विराजस कुलकर्णीनं त्याच्या एका कथेवर ‘फक्त महिलांसाठी’ हा सिनेमा लिहिला. ‘सेल्फी’ या नाटकाचा, त्यातील पात्रांचा सिनेमात समावेश नाही. नव्या कथेवर आम्ही सिनेमा करतोय; हे शिल्पा यांना सांगायचं माझ्याकडून राहून गेले. त्यासाठी मी क्षमस्व आहे.

लेखकांना सजग करण्यासाठी- शिल्पा नवलकर, लेखिका

मला सिनेमात कोणतंही श्रेय नको. मूळ संकल्पनेचे पैसे नको. मी मुद्दाम हा विषयी सोशल मीडियावर न टाकता आमच्या लेखकांच्या ग्रुपवर शेअर केला. कारण, इतर लेखकांना याविषयी समजावं. ‘सेल्फी’च्या हिंदी-इंग्रजी आवृत्तीत पाच बायकांचा एकत्र ट्रेन प्रवास होता. तो सिनेमात असल्याचंही दिसतंय. आता कथा वेगळी असली तरीही हा सिनेमा माझ्याबरोबर सुरू केला होता, त्यामुळे तो ‘सेल्फी’वरचाच आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मला केवळ माझ्या लेखक मित्रांना सजग करायचे होते.

‘थ्री चिअर्स’ही माझाच!

परितोष पेंटर लिखित-दिग्दर्शित ‘थ्री चिअर्स’ या सिनेमाविषयी कथा चोरीची चर्चा लेखकांमध्ये आहे. याविषयी पारितोष म्हणाला, ‘माझा हा सिनेमा मराठीतील एका गाजलेल्या नाटकावर आधारित आहे; अशी चर्चा लेखकांमध्ये होत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. पण ‘थ्री चिअर्स’ हा सिनेमा ‘तीन बंदर’ या नाटकावर आधारित आहे. गुजराती लेखक प्रबोध जोशी यांनी ते लिहिलं होतं. मी या नाटकाचे अधिकृत हक्क घेतले आहेत. त्यामुळे लेखक मित्रांनी माझ्याविषयी अफवा पसरवू नये.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.