मुंबई :महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून अभिनेते समीर चौघुले घराघरात पोहोचलेत. त्यांचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. पण यात अगदी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकरही आहेत. त्यांनीच समीर यांना फोन करून बोलवून घेतलं. त्यांना भेटल्यानंतरचा भारावून टाकणारा अनुभव समीर यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

समीर लिहितात, ‘ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी मोहनदास काका सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. ९३ वर्षांच्या या तरुणाने आजवर रंगभूमीवर केलेलं कार्य, काम, किस्से प्रत्यक्ष त्यांच्या मुखी ऐकणे हे अत्यंत आनंददायी होत. मोहनकाका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” नियमित बघतात आणि त्यांना माझे काम खूप आवडते हे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आमच्या दूरध्वनीवरील संभाषणात सांगितले होते. भेटायचा योग मात्र माझ्या कार्यबाहुल्यामुळे येत नव्हता.

Video : अनिशवरून अनिरुद्धची पुन्हा चिडचिड, आशुतोषनं चांगलंच ठणकावलं!

समीर सांगतात, ‘पण एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला,”समीर, अरे ९३ वर्षांचा आहे रे मी. तुला येऊन भेटायची इच्छा खूप आहे. पण शक्य होत नाही रे” कुठेतरी आत चर्र झालं. गेले काही महिने थोडा वेळही काढता न यावा इतकंही मोठं काम मी नक्कीच करत नसल्याची जाणीव झाली. स्वतःचाच राग आला आणि त्याच दिवशी मी मोहन काकांना त्यांच्या अंधेरीच्या घरी जाऊन भेटून आलो.’

अभिनेता पुढे लिहितात, ‘मला भेटल्यावर मोहन काकांनी मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या मिठीत वडीलकीची माया, थरथर आणि डोळ्यात आसवं होती. मलाही क्षणभर भरून आलं. त्यांनी काठी टेकवत एखाद्या मोठ्या सत्कारमूर्तीचा करतात तसा शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला. मी वाकून नमस्कार केला. मला सुरकुत्या पडलेल्या हातांनी भरभरून आशीर्वाद दिले. मला म्हणाले “तुझं आणि माझं दैवत एकच चार्ली चॅप्लिन. तू केलेला चार्ली चॅप्लिन बघितला तेव्हापासून तुला भेटायची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली”, मला म्हणाले, तू आत्ता ज्या जागेवर बसला आहेस ना त्या जागी काही वर्षांपूर्वी “वपु” बसून गेले आहेत. विंदा बसून गेले आहेत. पुल भाई बसले होते. मला काय बोलावं तेच कळेना.’

रंग माझा वेगळा : दीपावर एकापाठोपाठ संकटं, कशी वाचवणार सौंदर्या इनामदार तिला?

समीर पुढे सांगतात, ‘पुढचा अर्धा तास मी मोहन काकांचे किस्से, त्यांच्या संगीत नाटकांच्या आठवणी, त्या काळची दैवी माणसे याबद्धल फक्त ऐकत होतो आणि साठवत होतो. फोनवर त्यांचा ऐकलेला थकलेला आवाज त्या क्षणी गायब झाला होता. एक तुकतुकीत कांतीचा विलक्षण प्रतिभा असलेला एक तरुण माझ्या समोर मला दिसत होता. अनुभवाने, आपल्या कामाने पर्वताहून मोठे असलेले हे रंगकर्मी अत्यंत खुल्या दिलाने माझं कौतुक करत होते.


समीर चौघुले म्हणतात, काकांना भेटून एक गोष्ट मी अक्षरशः लुटली ती म्हणजे,समाधान. तुम्हाला कधी ही जुनेजाणते रंगकर्मी दिसले तर आवर्जून त्यांना भेटायला जा. त्यांची चौकशी करा. त्यांना किंचित नाॅस्टेलजिक होऊ द्या.

समीर यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. एक नेटकरी म्हणतो, समीर दादा तुम्ही फक्त कलाकार नाहीत तर चांगले माणूस आहात जो की दुसऱ्यांची मनं अगदी मनापासून जपतो.

फोटोचे दहा रुपये द्या म्हणजे माझी कमाई होईल; भारतीची फॅन्ससोबत मस्ती

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.