सातवी पास सुरेश धसला मंत्री करण्यापेक्षा मला करा:माझी लायकी विधानपरिषदेपेक्षा मोठी, गृहमंत्री नाहीतर अर्थमंत्री करा – लक्ष्मण हाके
विधानसपरिषद नको, माझी लायकी त्याहून मोठी आहे. मला राज्यात गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा शिक्षणमंत्री करा. त्या सातवी-आठवी पास असलेल्या सुरेश धसला जर तुम्ही मंत्री करणार असाल तर त्यापेक्षा मला करा, असे विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे. तसेच ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जे माध्यम मिळेल ते घेईन, असे सूचक विधान देखील हाके यांनी केले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, राज्यात ओबीसी असलेल्या अर्ध्या लोकांचे मी नेतृत्व करतो, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जे माध्यम मिळेल ते घेईन. सातवी-आठवी पास असलेल्या सुरेश धसला जर तुम्ही मंत्री करणार असाल तर त्यापेक्षा मला करा. माझी लायकी जास्त आहे, ज्ञान जास्त आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करावे लागेल ते मी करणार. रोहित पवारांचे कान कापून विजय साजरा केला पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसींनी त्यांचा प्रभाव दाखवला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या आगोदरच सांगितलं होता की दुप्पट हरियाणा पॅटर्न असेल. माझ्यामुळे अनेक उमेदवार आले आणि अनेकजण पडले. जरांगे, टोपे, शरद पवार हे हवेत होते, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. राजेश टोपे यांची 25 वर्षांची सत्ता ही 2500 मतांनी घालवली. रोहित पवारांचे कान कापून विजय साजरा केला, असे लक्ष्मण हाके म्हणाले. जरांगेसारखी शेपूट घालून पळून गेलो नाही मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना लक्ष्मण हाके म्हणाले, आम्ही 9 ठिकाणी उमेदवारी घेतली. त्यांनी हजारो मते घेतली. जरांगेसारखी शेपूट घालून पळून गेलो नाही. इतर ठिकाणी आम्ही महायुतीला पाठिंबा दिला असेही लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितले. मागच्या विधानसभेला धनगर समाजाचा एकच आमदार होता, आता सात आमदार झाले आहेत. तसेच उत्तम जानकर यांना देखील आम्ही निवडून आणले असल्याचा दावाही हाके यांनी केला आहे. लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला देखील नाव न घेता संमती दर्शवली आहे. ज्यांच्या नावाने मते मागितली, ज्यांचा चेहरा या निवडणुकीत वापरला त्यालाच मुख्यमंत्री करा, असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.