मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. चित्रपटगृहांमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. त्याचे लूक्स लक्षवेधी ठरत आहेत. शाहरुखच्या जवाननं धमाका केला असताना दुसरीकडे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.शाहरुखचा लेक आर्यन खानला समीर वानखेडेंनी २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझवरुन अटक केली होती. ड्रग्ज प्रकरणात केलेली ही अटक देशभरात गाजली. आर्यन खानला वाचवण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप वानखेडेंवर झाला. गंभीर आरोपामुळे वानखेडे अडचणीत आले. आर्यनच्या अटकेसाठी कट रचल्याचा आणि त्याच्या सुटकेसाठी पैसे मागितल्याचा आरोप झाल्यानं वानखेडेंचा पाय खोलात सापडला. मात्र आता केंद्रीय प्रशासकीय लवादानं (सीएटी) या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या या प्रकरणाची दिशा बदलू शकते.आर्यन खानला एसआयटीच्या तपासानंतर एनसीबीनं क्लीन चिट दिली होती. आता या प्रकरणात समीर वानखेडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. सीएटीनं आपल्या आदेशात वानखेडेंविरोधात चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकातील ज्ञानेश्वर सिंह यांच्या समावेशाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्ञानेश्वर सिंह एनसीबीचे उपसंचालक आहेत. क्रूझवर छापा मारताना समीर वानखेडेंनी सिंह यांनी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेतली होती. त्या अधिकाऱ्यांमध्ये सिंह यांचाही समावेश होता. ज्या अधिकाऱ्यांनी आदेश दिला, तेच अधिकारी तपास पथकाचा भाग कसा काय असू शकतात, असा सवाल सीएटीनं विचारला आहे.एसईटीचा अहवाल प्राथमिक स्वरुपाचा होता, असा तर्क एनसीबीनं सीएटीसमोर मांडला. समीर वानखेडेंवर कारवाई करताना केंद्र सरकार आणि एनसीबीद्वारे एक स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल. लवादांच्या न्यायमूर्तींचं खंडपीठ समीर वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी घेत होतं. त्यांच्याकडे ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एसईटीनं महत्त्वाची मागणी केली. जबरदस्तीची वसुली आणि लाचखोरीचे गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात वानखेडेंसह अन्य चार जणांवर शाहरुखचा मुलगा आर्यनला अडकवून त्याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे.