केंद्र सरकारचे सर्व निर्णय शेतकरी विरोधी:सत्ता हाती दिल्यास 5 निर्णयांची अंमलबजावणी करणे मविआची गॅरंटी : शरद पवार

केंद्र सरकारचे सर्व निर्णय शेतकरी विरोधी:सत्ता हाती दिल्यास 5 निर्णयांची अंमलबजावणी करणे मविआची गॅरंटी : शरद पवार

राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीने पाच महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले असून मतदारांनी राज्याची सत्ता हाती दिल्यास पाच आश्वासनांची पुर्तता करेल हि महाविकास आघाडीची गॅरंटी असेल असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी ता. ८ वसमत येथे प्रचार सभेत दिला आहे. वसमत येथे महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, खासदार नागेश पाटील आष्टीकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पवार म्हणाले की, देशातील एनडीए सरकारने नागरिकांच्या आपेक्षांची पुर्तता केली नाही. शेतीमालास भाव नाही, खते, बियाणे व औषधांच्या किंमती वाढल्या आहेत. केंद्र सरकारचे सर्व निर्णय शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारला तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करता आले नाहीत अशी टिकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी सरकारला सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने चांगलाच झटका दिला असून पंतप्रधान मोदी यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. चारशे पारचा नारा देणाऱ्या मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू अन् नितीशकुमार यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे लागले. राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन झाल्यानंतर पाच महत्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. यामध्ये महालक्ष्मी योजनेमध्ये महिलांना दरमहा ३००० रुपये दिले जाणार असून महिला, मुलींच्या संरक्षणासोबतच त्यांना एसटी मध्ये मोफत प्रवास दिला जाईल. शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाईल. जातीनिहाय जनगणना केली जाणार असून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून गरजूंना आरक्षण दिले जाईल. बेरोजगारांना नोकरी मिळे पर्यंत दरमहा चार हजार रुपये मदत दिली जाईल तर नागरीकांचा २५लाखांचा आरोग्य विमा काढून त्यांना आरोग्यसेवेमध्ये औषधी मोफत दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिली. या पाचही निर्णयांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा असून जनतेने महाविकास आघाडीला मतदानातून पाठिंबा द्यावा. त्यानंतर राज्याची सत्ता हाती घेऊन या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महाविकास आघाडीची गॅरंटी असल्याचा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment