शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर अजित पवारांना भिडली:7 जागांवर झाली विजयी, 51 जागांवर दोन्ही सेना समोरासमोर; 36 जागांवर शिंदेसेनेची उबाठाला धोबीपछाड
जून २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली अन् राज्यात तख्तपालट झाले. यानंतर ‘गद्दार’ असा शिक्का लागलेल्या शिंदेसेनेचे राज्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. राज्यात ५१ ठिकाणी दोन्ही सेना एकमेकांसमोर लढल्या. पण, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने २० जागांवर विजय मिळवला. यापैकी १४ जागांवर शिवसेनेवर मात केली. शिंदेसेना राज्यात ५७ ठिकाणी जिंकली. यापैकी ३६ जागांवर त्यांनी उबाठाच्या उमेदवारांना धोबीपछाड दिली. याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादींपैकी मुरब्बी शरद पवारांची राष्ट्रवादी गब्बर ठरणार की पुतण्या अजित पवारांची राष्ट्रवादी पसंतीला उतरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या राष्ट्रवादी ३६ जागांवर एकमेकांसमोर आल्या होत्या. राज्यात १० जागा शरद पवार राष्ट्रवादीने जिंकल्या. यातील ७ ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात दिली.
उद्धवसेनेचेही आठ नवीन चेहरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील २० जागांपैकी शिवसेनेसमोर ८ जागांवर नवीन उमेदवार निवडून आणले आहेत. यामध्ये सिद्धार्थ खरात, गजानन लवाटे, संजय देरकर, अनंत नार, हारूण खान, वरुण सरदेसाई, महेश सावंत, प्रवीण स्वामी यांचा समावेश आहे. तर इतर पक्षातही काही नवीन चेहरे निवडून आले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यंदा काही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे पहायला मिळाले. मुंबई विभागात उबाठाने दबदबा कायम ठेवला दोन्ही सेनेमध्ये कांटे की टक्कर झाली असली आणि शिंदेसेनेने उबाठाला धूळ चारली असली तरीही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईवर मात्र उबाठाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. शरद पवारांचे ३ आमदार पहिल्यांदाच विधानसभेत शरद पवारांनी ३ आमदारांना पहिल्यांदाच निवडून आणले आहे. यापैकी म्हाड्याचे अभिजित पाटील, मोहोळचे राजू खरे आणि तासगावचे आर.आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.