शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन:परभणी अन् बीडसंदर्भात चर्चा, म्हणाले – महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधला. दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. फडणवीसांसोबत परभणी आणि बीड प्रकरणांतील संदर्भात चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही, असेही शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा रंगत आहे. कारण एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले जात आहे. शरद पवार यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निवडणुकीतील कामाचे कौतुक केले होते. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली. पण ही चर्चा महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही
पुणे दिल्ली साहित्य संमेलनातील भाषणांचा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी येथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर चर्चा झाली. हा भाग शांत झाली पाहिजे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही. अशांत महाराष्ट्र असे चित्र होवू द्यायचे नाही
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, संकट येतात मात्र तुम्ही जागृत असाल हवे. संकटाच्या काळात लोक सहकार्य आणि साथ देत असतात. गेले काही दिवस महाराष्ट्रात अस्वस्थ वातावरण दिसत आहे. बीड, परभणी कसे शांत करता येईल, हे पहिले पाहिजे. अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होवू द्यायचे नाही. शरद पवारांनी 3 दिवसांपूर्वी देखील केला होता फोन
दरम्यान, शरद पवार यांनी 3 दिवसांपूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संवाद साधला होता. यावेळी शरद पवारांनी राज्यातील पवनचक्की मालकांना खंडणीसंबंधी होणाऱ्या त्रासाबाबत माहिती देत सातारा, पाटण, कोल्हापूर, बीड आणि सांगली या भागांमध्ये खंडणीची प्रकरणे वाढल्याचा उल्लेख केला. या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहशत मोडून काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले होते.