ब्लू जेट हेल्थकेअर या कारखान्यांमध्ये शुक्रवारी ३ नोव्हेंबरला भीषण स्फोट होऊन सात कामगार गंभीर जखमी झाले. तर बेपत्ता असलेल्या अकरा कामगारांपैकी सात कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित दगावलेल्या कामगारांची शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे. सापडलेले मृतदेह अक्षरश: जळून खाक झाल्याने त्यांची ओळख पटवणे खूपच अवघड झाले आहे. या मोठ्या दुर्घटनेत तब्बल अकरा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
या अपघातात दगावलेल्या मृतांच्या आता केवळ आठवणीच उरल्या आहेत. महाड शहराजवळ असणाऱ्या चोचींदे गावातील आदित्य मोरे हा तरुण नुकताच बीएससी पास झाला. आदित्यचे वडील एका औषध दुकानात कामाला आहेत. मुलाला त्यांनी शिकवून मोठे केले. केवळ तीनच महिन्यांपूर्वी आदित्य ब्लू जेट कंपनीमध्ये कामाला लागला होता. एकीकडे आपले काम सांभाळत असताना त्याला एमएससी होण्याची मोठी इच्छा होती. त्यामुळे त्याने आपल्या काही मित्रांसोबत एमएससीला ऍडमिशन घेतले होते.
तीन नोव्हेंबरला आदित्यची सेकंड शिफ्ट होती. परंतु काही कारणास्तव त्याने ही शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्ट घेतली. आणि कामावर असताना ब्ल्यू जेट कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. यात दगावलेल्या कामगारांमध्ये आदित्यचा देखील समावेश आहे. आपल्या गावातील तरुण मुलाच्या या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News