शिंदेचे भाजपच ‘हाय कमांड’, दुसरा पर्याय नाही:संजय राऊत यांची टीका; मुंबई व्यतिरीक्त इतर ठिकाणी आघाडी करण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो, तर विधानसभा निवडणुकीत आम्ही पराभूत झालो. याची कारणे सर्वांनाच माहिती आहेत. मात्र पराभव झाल्याने खचून न जाता आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याची घोषणा आमच्या पक्षाने केली असली तरी याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली किंवा महाविकास आघाडीत फूट पडली असा होत नाही. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. केवळ मुंबईत आम्ही स्वबळावर लढणार असून इतर ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत हे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातील इतर ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. या निमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे, असे पुणे विभागातील काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, ज्या त्या विभागातील पदाधिकाऱ्यांचे मत जसे असेल त्या संदर्भात आम्ही तसा निर्णय घेणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. तर मुंबईमध्ये स्वळावर लढावे, असे तेथील पदाधिकाऱ्यांची इच्छा असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढावे इशी भूमिका व्यक्त केली आहे. मात्र इतर ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या भावना वेगळ्या असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी असेच होणार असा त्याचा अर्थ होत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचे जे मत असेल, तसे निर्णय घेणार असल्याचे देखील ते म्हणाले. एकनाथ शिंदेसमोर दुसरा पर्यान नाही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी देखील त्यांच्या हाय कमांडचा मान राखला. काही करून त्यांना सत्तेत राहायचे हीच या सर्वांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली. त्यांना 2024 मध्ये देखील आपण मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. तरीही ते मुख्यमंत्री झाले नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी भारतीय जनता पक्ष हे हाय कमांड आहे. त्यामुळे त्यांनी आदेश दिला तो त्यांना स्वीकारावाच लागेल. त्यामुळे मान राखला असे म्हणता येणार नाही. वास्तविक एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नसते तर त्यांच्याकडे पर्याय काय होता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्यावरील खटले आणि कारवाई थांबवण्यासाठी सरकारमध्ये जाणे, याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे हा त्यांचा प्रश्न आणि त्यांचे राजकारण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना फोडण्यात आली, त्याच पद्धतीने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष देखील तोडला जाईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पक्ष तोडण्याची त्यांना चटक लागली आहे. देशभरात देखील असेच होणार आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या देखील पक्षाचे असेच होणार आहे. पक्ष तोडण्याचे रक्त त्यांच्या जीभीला लागले आहे. जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण चालू राहणार असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.