मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंच्या खासदारांची दिल्लीत लॉबिंग:नरेंद्र मोदींकडे मागितली भेटीची वेळ, माजी खासदारांचाही समावेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. विद्यमान खासदारांसोबत या शिष्टमंडळामध्ये काही माजी खासदारांचा देखील समावेश असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी या खासदारांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेच्या खासदारांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले असून बहुमताचा आकड्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या देखील आमदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत तर तर्क वितर्क लावले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांनाच पुन्हा संधी देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे मागणी केली आहे. या संदर्भात जाहीर वक्तव्य देखील करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्री शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यांच्या नेत्यांनी केली आहे. यासाठी आता एकनाथ शिंदे यांचे खासदार दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या संदर्भात भाजप काय निर्णय घेतो? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिंदे आज राजीनामा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यामुळे ते आज राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील सरकारचा शपथविधी होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.