साई प्रसादालयामुळे शिर्डीत भिकारींची संख्या वाढली:मोफत जेवण बंद करा, सुजय विखेंची मागणी, म्हणाले – मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च करावा

साई प्रसादालयामुळे शिर्डीत भिकारींची संख्या वाढली:मोफत जेवण बंद करा, सुजय विखेंची मागणी, म्हणाले – मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च करावा

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर आक्षेप घेतला आहे. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले असून शिर्डीत भिकारींची संख्या वाढली, असे विधान सुजय विखे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सुजय विखेंच्या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. देशासह परदेशातील नागरिकही याठिकाणी येत असल्याचे पाहायला मिळते. साईबाबा संस्थानच्या वतीने साई प्रसादलयात भाविकांसाठी मोफत जेवण देण्यात येते. साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. सुजय विखे यांनी याच मोफत जेवणावर आक्षेप घेत, ते बंद करण्याची मागणी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काय म्हणाले सुजय विखे?
शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावे, असे म्हणत या फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले असून शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे, असा दावा सुजय विखे यांनी केला आहे. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी देखील माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शिर्डीतील साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना मोफत भोजन देत आहे. हे मोफत जेवण बंद करावे आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, अशी अपेक्षा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. संस्थानच्या माजी विश्वस्तांचा विखेंना टोला
सुजय विखे यांच्या वक्तव्यावर साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साई भक्तांनी 365 दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवले आहे. साईबाबा संस्थानवर याचा आर्थिक बोजा पडत नाही. साई संस्थानकडे 450 कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. संस्थांनला तो निधी इतर कुठेही वापरता येत नाही, असे सांगत अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे या दृष्टीने बघू नये. असा टोला एकनाथ गोंदीकर यांनी सुजय विखे यांना लगावला. सुजय विखेंना शिंदे गटाचा पाठिंबा
सुजय विखे यांच्या वक्तव्याला शिंदे गटाने पाठिंबा दर्शवला आहे. सुजय विखे पाटलांच्या भूमिकेला आमचे समर्थन आहे. साई भक्तांनी दिलेल्या दानाचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने साई संस्थानने करावा, अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करत होतो, असे शिंदे गटाचे पदाधिकारी कमलाकर कोते यांनी म्हटले. साई संस्थान प्रसादालयात मोफत प्रसादामुळे काही लोक ते जेवण म्हणून घेतात आणि त्याचा दुरुपयोग देखील होत आहे. शिर्डीत गुन्हेगारी आणि भिक्षेकरुनची संख्या वाढत आहे. कोणतीही गोष्ट मोफत असू नये. साई संस्थांनच्या प्रसादालयातील भोजनाला मोल असावे, असेही कोते म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment