शिवसेना नेते अशोक धोडींचा ‘दृश्यम’ स्टाईल मर्डर:खदानीच्या पाण्यात सापडली कार, डिक्कीत मृतदेह पाहून उडाली एकच खळबळ

शिवसेना शिंदे गटाचे नेते अशोक धोडी हे गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात पोलिसांना काही अंशी यश आल्याचे समोर आले आहे. अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रेझा कार गुजरातच्या भिलाड येथील सरिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत सापडली आहे. घटनेची माहिती कळताच पालघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पालघर पोलिसांनी येथील गोतेखोरांच्या मदतीने तसेच हायड्राच्या मदतीने अशोक धोडी यांची कार पाण्यातून वर काढण्यात आली आहे. तसेच या शोध मोहिमेत गोतेखोरांना एक काळ्या रंगाचे जॅकेट तसेच पांढऱ्या रंगाचे हेडफोन सापडले आहे. कारची तपासणी केलील असता कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक धोडी हे डहाणू तालुका विधानसभा संघटक होते. अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. धोडी यांचा शोध घेण्यासाठी आठ टीम तयार करण्यात आल्या होत्या. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुजरातच्या भिलाडमध्ये जाऊन धोडी यांचा शोध घेतला असता येथील एका बंद खदानीत धोडी यांची कार सापडली. गोतेखोर आणि क्रेनच्या मदतीने ही कार काढण्यात आली. या कारचा तपास केला असता कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र, आता हा खून कोणी केला? कोणी केले होते अपहरण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः याप्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे कारमधील मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्यांचाच आहे का, याचा तपास केला जात आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी फरार तसेच अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी पोलिसांचा तपास सुरू असतानाच फरार झाला असल्याचे समजते. गेल्या काही वर्षापासून अशोक धोडी आणि त्यांचा भाऊ अविनाश धोडी यांच्यात संपत्तीबाबत वाद सुरू होते. वैयक्तिक वैमनस्यातून भावाने अन्य आरोपींसोबत मिळून हे कृत्य केले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. घरी जाताना झाले होते अपहरण अशोक धोडी हे 20 जानेवारी रोजी मीरा रोड साई बाबा नगर येथील श्रीनगर अपार्टमेंट येथे आल्याचे तिथल्या सीसीटीव्हीमध्ये आढळून आले आहे. घरगुती कामासाठी अशोक धोडी हे मीरा रोड या भागात आले होते. तिथून घरी परत जात असताना त्यांचे अपहरण झाले आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल- पालकमंत्री दरम्यान, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी अशोक धोडी यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणावर माझे बारीक लक्ष असून जे कोणी या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. असे मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असेही ते म्हणाले.