बिवाली अर्थात प्रियदर्शिनीचा पहिला वहिला मराठी सिनेमा ‘फुलराणी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने शिवालीने तिच्या लाडक्या मैत्रिणीसाठी खास पोस्ट केली आहे. शिवालीने इन्स्टाग्रामवर ‘फुलराणी’मधील प्रियदर्शिनीच्या संवादाचे रील पोस्ट केले आहे. प्रियदर्शिनीनेही यामध्ये तिची साथ दिली. हे रील पोस्ट करताना शिवालीने लिहिले की, ‘फॉर बिवाली… कुठून सुरवात करू समजत नाही आहे. चार वर्ष एकत्र काम करतोय, खूप जवळुन प्रवास पाहिला आहे तुझा. ही पोस्ट तुझ्या कौतुकासाठी करावी वाटतेय. खूप कौतुक खूप प्रेम खूप शुभेच्छा! #yetobasshuruathai’.
मैत्रिणीने अशी कौतुकाने पाठ थोपटल्यानंतर प्रियदर्शिनीनेही आभार व्यक्त करणारी कमेंट केली आहे. प्रियदर्शिनीने या रील व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘प्रिय शिवाली, इतक्या उत्साहाने रील करून घेतलीस माझ्याकडून, तिथेच प्रेम कळतंय तुझं. प्रचंड थँक्यू. तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी नकळत शिकले आहे. असंच एकमेकींकडून शिकत राहू. खूप प्रेम.’ शिवाली आणि बिलावी यांचा हा गोड संवाद त्यांच्या चाहत्यांनाही आवडला असून ते प्रियदर्शिनीला तिच्या पहिल्या-वहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत.
गुढीपाडव्यापासून ‘फुलराणी’ येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
प्रियदर्शिनीचा ‘फुलराणी’ हा सिनेमा २२ मार्चपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये तिच्यासह मुख्य भूमिकेत मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आहे. याशिवाय या सिनेमात दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, मिलिंद शिंदे, सुशांत शेलार, अश्विनी कुलकर्णी, गौरव घाटणकर आणि गौरव मालणकर अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत.