शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी कोल्हापूर दौरा उरकल्यानंतर कार्ला गडावर येऊन आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तेजस यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली.
सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू आहे. त्यात शिंदे गट आणि शिवसेना असे दोन गट पडले आहेत. मात्र जेव्हा जेव्हा ठाकरे कुटुंबियांवर संकट आले त्या त्या वेळी ठाकरे परिवारातील सदस्यांनी आई एकवीरेच्या पायावर माथा टेकवत यश मिळावे, असे साकडे घातले व यश मिळाल्यानंतर गडावर येऊन नवस देखील फेडल्याची अनेक उदाहरणे आहेत.
तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नसले तरी त्याने शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन व आशीर्वाद घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात शिवसेना संपते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मात्र, या घटनेनंतर आदित्य ठाकरे राजकारणात आणखी सक्रिय होत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, तेजस ठाकरे यांनी एकवीरा आईचे दर्शन घेतल्याने शिवसेनेवर आलेली संकटे दूर होतील का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तेजस ठाकरे यांनी मागितलेली मनोकामना पूर्ण होणार का? शिवसेना पुन्हा उभारी घेणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.