सांगली : राज्यातील आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडीचा प्रस्ताव दिलाय, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारसह राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशाची राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. नेहरुंनी कबुतर सोडली होती. मोदींनी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं आंबेडकर म्हणाले.

दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडून सरकारी संपत्ती विकण्यावरून ज्या पद्धतीची टिप्पणी करण्यात आली, ती पाहता आपण दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका करताना सांगितलं होतं, की एखाद्या दारुड्याला दारुसाठी पैसे मिळाले नाही की, तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो, तशाच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दारुड्याप्रमाणे वर्तन असल्याचे सांगितले होते. याला आता रिझर्व बँकेकडून दोन महिन्यांपूर्वी पुष्टी देण्यात आलेली आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींवर आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर बोलताना आंबेडकर म्हणाले, भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठं चालला आहे, आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे, अशी टीका आंबेडकर यांनी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर केली आहे. तसेच श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी सर्व प्रयत्न केले. श्रीमंत मराठ्यांबरोबर गरीब मराठ्यांची यापुढे युती फार काळ चालणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा : गुलाबराव पाटील काय हिंदुत्ववादी होणार, फायद्यासाठी शिंदेंनाच ‘आजा’ बनवलं

राष्ट्रवादीकडे घड्याळ नसेल, तर त्यांचं 80 टक्के मतदान भाजपला जातं. तसंच काँग्रेसबाबत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले की भाजपला फायदा होतो, आणि वेगळे लढले की भाजपला फटका बसतो, असे मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

तर वेदांता प्रोजेक्टबाबत गुजरात आणि त्या कंपनीमध्ये करार झाला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत प्रोजेक्ट परत येणार नाही, पण त्या प्रोजेक्ट बाबतीत कधी बोलणी सुरू झाली, याची तारीख जाहीर करायला हवी, त्यामुळे शेलार जे आरोप करत आहेत, ते नेमकं खरे आहेत की खोटे हे स्पष्ट होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, मृतदेहाजवळ सुसाईड नोटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.