अहमदाबाद: भारतीय संघ आणि भारतीय चाहत्यांचे पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. टीम इंडियाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने विश्वचषक जरी जिंकला नसला तरी त्यांनी संपूर्ण टूर्नामेंटमध्ये केलेल्या अद्वितीय अशा कामगिरीने सर्वांची मन जिंकली आहेत. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवनंतरही भारतीय संघाचे चाहते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये संघाने मैदानावर सर्वांचे मनोरंजन केलेच पण महत्त्वाचं म्हणजे बेस्ट फिल्डर अवॉर्ड कोणाला मिळणार याची उत्सुकताही सर्वांना असायची आणि दुसऱ्या दिवशी हा व्हिडीओ कधी येतोय, याची सर्व आतुरतेने वाट पाहायचे. आता फायनलच्या सामन्यात कोणता खेळाडू बेस्ट फिल्डर ठरला आहे, याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. भारताने अथक प्रयत्न करूनही त्यांना फायनल सामना जिंकता आला नाही आणि त्यामुळेच भारताचे सर्वच खेळाडू प्रचंड निराश दिसले. मोहम्मद सिराजला मैदानावरच अश्रू आवरता आले नाहीत. रोहित शर्माने खूप प्रयत्न करत अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला आणि तो थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला. या ड्रेसिंग रूम बेस्ट फिल्डर अवॉर्डच्या व्हिडीओमध्ये सुद्धा भयंकर शांतात होती. सर्वच खेळाडू हिरमुसल्या चेहऱ्याने, खांदे वाकलेले आणि निराश होऊन बसले होते. पण भारताच्या फिल्डिंग कोचनेही संघाच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बेस्ट फिल्डर अवॉर्डपासूनचे भारतीय संघाचे काही क्षण या व्हिडीओचा सुरुवातीला दाखवण्यात आले. त्यानंतर फायनल सामन्याचा बेस्ट फिल्डर घोषित करण्यात आला. विराट कोहलीला पहिल्या सामन्याचा बेस्ट फिल्डर अवॉर्ड देण्यात आला होता तर विराटने आता शेवटच्या आणि फायनल सामन्यात हे बेस्ट फिल्डरचे मेडल जिंकले आहे. कोच टी दिलीप यांनी विराटच्या मैदानावरील एकदंरीत कामगिरीचे कौतुक करत रवींद्र जडेजाकडून त्याला हे मेडल देण्यात आले. कायम आनंदात आणि जल्लोषात येणार हा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ फायनलनंतर भयाण शांततेत असलेला पाहायला मिळाला. भारताने विश्वचषक जिंकला नसला तरी भारताच्या खेळाडूंच्या कामगिरीने नक्कीच सर्व चाहते आनंदित आहेत. या बेस्ट फिल्डर सेरेमनीनंतर संघाचे फिल्डींग कोच टी. दिलीप यांनी सर्व भारतीय चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी खूप खूप आभार मानले आहेत.