क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. या सामन्यासाठी तो नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचला होता. सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघ हस्तांदोलन करत होते तेव्हा सचिन तेंडुलकर काही वेळ शुभमन गिलशी बोलला. त्याने गिलच्या कानात काहीतरी सांगितले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सचिनने शुभमन गिलचे कौतुक करणारे ट्विटही केले होते. आरसीबीविरुद्ध गिलने शतक झळकावल्याने मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. आता पुन्हा एकदा समोरून त्याच्या शतकी कामगिरीनंतर शुभमन गिलचे कौतुक केले आहे.
मोसमातील तिसरे शतक
शुभमन गिलची आयपीएल २०२३ मध्ये तीन शतके आहेत. या मोसमापूर्वी त्याचे एकही शतक झाले नव्हते. ही तिन्ही शतके गेल्या ४ सामन्यांमध्ये झाली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिले शतक झळकावल्यानंतर गिलने पुढच्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध शतक झळकावले. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये तो सेट झाल्यानंतर बाद झाला. आता पुन्हा एकदा फायनलमध्ये चेन्नईची गोलंदाजी गिलसमोर असणार आहे.
शुभमन गिलसाठी २०२३ हे स्वप्नासारखे होते. त्याने वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये द्विशतक झळकावले होते. न्यूझीलंडविरुद्धच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतही त्याने शतक झळकावले होते. आयपीएलच्या फायनलनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषकही आहे.