सोयाबीन खरेदीला सहा दिवसांची मुदतवाढ:6 फेब्रुवारी 2025 पर्यंत खरेदी होणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

सोयाबीन खरेदीला सहा दिवसांची मुदतवाढ:6 फेब्रुवारी 2025 पर्यंत खरेदी होणार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मंत्री रावल म्हणाले की, राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती, ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता. आज ती मुदतवाढ मिळाली. या मुदतवाढीमुळे राज्याला दिलेल्या 14 लाख 13 हजार 269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4 लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे. दि.6 फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिली आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मंत्री रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment