उपांत्य फेरीच्या सामन्यात संथ खेळपट्टी अपेक्षित आहे. संघ व्यवस्थापनानं बीसीसीआयच्या क्युरेटर्सना वानखेडेच्या खेळपट्टीवरील बहुतांश गवत काढून टाकण्यास सांगितलं आहे. नेदरलँड्सविरुद्ध बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या थिंक टँकनं वानखेडेच्या क्युरेटर्सशी संपर्क साधून त्यांना खेळपट्टीबद्दल कळवल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.
टीम इंडिया मुंबईत पोहोचण्याआधीच संथ खेळपट्टी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘खेळपट्टी फिरकीला फारशी साथ देणार नाही. पण संथ खेळपट्टीची मागणी संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळेच आम्ही गवत हटवलं आहे,’ अशी माहिती सुत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाची संथ खेळपट्ट्यांवरील कामगिरी उत्तम राहिली आहे. भारतीय संघाचे सामने संथ खेळपट्ट्यांवरच व्हावेत अशी विनंती संघ व्यवस्थापनानं वर्ल्डकप सुरू होण्याच्या आधी केली होती. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मंगळवारी खेळपट्टीची पाहणी केली. संध्याकाळी संघ व्यवस्थापनानं ग्राऊंड स्टाफशी संपर्क साधला. सराव सत्रानंतर मैदानात अँटी ड्यू केमिकल फवारण्यात येणार आहे का, याबद्दल व्यवस्थापनाकडून विचारणा करण्यात आली.
यंदाच्या वर्ल्डकपमधील आकडेवारी पाहता, वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाठलाग करणं कठीण राहिलं आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना ४ पैकी केवळ एका सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग झाला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा पराभव केला. या सामन्यातही कांगारु पराभवाच्या छायेत होते. पण मॅक्सवेलनं घडवलेल्या चमत्कारामुळे ऑस्ट्रेलियाची नय्या पार झाली.