दोहा : फिफा विश्वचषकात आतापर्यंत अशी गोष्ट कधीही पाहायला मिळाली नसेल. कारण फुटबॉलमध्ये गोल केल्यावर जोरदार सेलिब्रेशन केले जाते. पण यावेळी मात्र गोल केल्यावर खेळाडूने संघाचीच माफी मागितल्याचे आता समोर आले आहे.

स्वित्झर्लंडचा स्ट्रायकर ब्रील एम्बोलोने गुरुवारी अल जानोब स्टेडियमवर दमदार गोल केला. हा त्याच्या संघासाठीचा एकमेव गोल होता. ब्रीलच्या या एकमेव गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने विजय साकारला. पण जेव्हा ब्रीलने गोल केला तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी त्याच्याजवळ संघातील खेळाडूंनी धाव घेतली. या गोलचे आता जोरदार सेलिब्रेशन होणार, असे वाटत होते. पण जेव्हा ब्रीलचे सहकारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी धावत आले तेव्हा त्याने सेलिब्रेशन करण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने आपल्या संघातील खेळाडूंची माफीही मागितली.

ब्रीलने ४८ व्या मिनिटाला गोल करून स्विस संघाला आघाडी मिळवून दिली. पण त्याने या गोलचे सेलिब्रेशन का केले नाही, याचे कारणही आता समोर आले आहे. स्विझचा सामना यावेळी कॅमरूनबरोबर होता. या सामन्यात ब्रीलने गोल केला, पण त्याच्या जन्म हा कॅमेरूनमध्ये झाला होता. त्यामुळे गोल केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिलगिरी व्यक्त करून शांत उभा राहिला. या सामन्याच्या पहिल्या सत्रात एकही गोल झाला नव्हता. शाकिरीच्या पासवर ब्रील एम्बोलो (४८ मि.) याने केलेल्या गोलच्या जोरावर स्वित्झर्लंडने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये कॅमेरूनवर १-०ने मात केली.

जागतिक क्रमवारीत स्वित्झर्लंड १५व्या, तर कॅमेरून ४३व्या क्रमांकावर आहे. मात्र, आफ्रिकेतील कॅमेरूनने क्रमवारी ही केवळ गौण असल्याचे आपल्या खेळाने दाखवून दिले. खेळाची सुरुवात वेगवान झाली. पहिल्या आठ मिनिटांत स्वित्झर्लंडने वर्चस्व राखल्यानंतर उत्साही कॅमेरूनच्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखविले. यामुळे कॅमेरूनला पूर्वार्धात दोन वेळा गोल करण्याच्या चांगल्या संधी होत्या. जीन-एरिक मॅक्सिम चोपो-माटिंग या कॅमेरूनच्या खेळाडूने काही अप्रतिम चाली रचल्या. मात्र, त्याचे तो गोलमध्ये रूपांतर करू शकला नाही. अर्थात, स्वित्झर्लंडला उत्तरार्धात त्याची दहशत जाणवलीच. आघाडीपटूंनीच नाही, तर कॅमेरूनच्या बचाव फळीने पूर्वार्धात भक्कम बचावही केला. उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच स्वित्झर्लंडने गोल करून आघाडी मिळवली. यानंतर मात्र कॅमेरूनला बरोबरी काही साधता आली नाही. स्वित्झर्लंडच्या झेरदान शाकिरी याचा संघाच्या गेल्या चार प्रमुख सामन्यांतील २४ गोलमध्ये थेट सहभाग होता. त्यामुळे शाकिरीने आतापर्यंत संघाच्या विजयात किती वेळा मोलाचा वाटा उचलला आहे, हे स्पष्ट झाले आहे..Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *