म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडी धरणात ८.६० टीएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी झालेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे पाणीप्रश्न चिघळला आहे. तब्बल चार तासांच्या आंदोलनामुळे जालना रोड ठप्प झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करीत आमदार आणि माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या सर्वपक्षीय आंदोलनाकडे भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व कॅबिनेट बैठकीच्या निर्णयाला अधीन राहून बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी तत्त्वतः पाणी सोडण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाचे पत्र मिळाल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे येथील आंदोलन मागे घेण्यात आले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पाच धरण समूहातून जायकवाडीत ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीने सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. आमदार राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, आमदार संजय शिरसाट, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राहुल पाटील, आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार अमरसिंह पंडीत, डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, अर्जुन खोतकर, अण्णासाहेब माने, संजय वाघचौरे, बबलू चौधरी, बदामराव पंडीत, नंदकुमार घोडेले, ‘मसिआ’चे अध्यक्ष अनिल पाटील, मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, शारेख नक्षबंदी, कॉ. राजन क्षीरसागर, मुश्ताक अहमद, रंगनाथ काळे, हरिश्चंद्र लघाने, कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील, पूजा मोरे, पांडुरंग तायडे, नितीन देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत रस्ता अडविला. त्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी वाढत गेली आणि जालना रोडवर दोन्ही बाजुने ठिय्या मांडला. त्यामुळे काही वेळातच वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना पांगवून एका बाजुने वाहतूक सुरळीत केली. पण, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक खोळंबली होती. तब्बल चार तास जालना रोडवरील वाहतूक एका बाजुने बंद होती. जलसंपदा विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासनाने टोपे यांना आंदोलन थांबविण्याची विनंती केली. पण, ठोस निर्णय होईपर्यंत रस्त्यावरुन उठणार नसल्याचे टोपे यांनी खडसावले. मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात पाणीप्रश्नावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पण, स्पष्ट खुलासा झाला नसल्याने आंदोलन चिघळले. अखेरीस पोलिसांनी बळाचा वापर करीत टोपे, पंडीत यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना तब्बल एक तासाने चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पाणी सोडण्याचा ठोस निर्णय देण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजप नेत्यांची आंदोलनाकडे पाठपाण्याच्या आंदोलनाकडे भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे भाजप सोडून सर्वपक्षीय एकजुटीचा विजय असो अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भाजप नेते बबनराव लोणीकर आणि हरिभाऊ बागडे यांच्याशी बोललो होतो. पण, त्यांनी मराठवाड्याला पक्षापेक्षा कमी महत्त्व दिले, अशी टीका आमदार टोपे यांनी केली. आंदोलन चिघळल्यानंतर तीन तासांनी आमदार बागडे आंदोलनस्थळी आले. पण, आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ‘पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनी पाणी सोडणार असल्याचा शब्द दिला आहे. ते सांगण्यासाठी इथे आलो होतो. पण, विरोधी पक्षाचे लोक पाणीप्रश्नाचे राजकारण करीत आहेत’, असे बागडे यांनी सांगितले. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील २३ धरणातून जायकवाडी धरणात हक्काचे पाणी सोडले पाहिजे. मराठवाड्यातील जनतेला सरकारने गृहीत धरु नये. जलसंपदा विभागाने आदेश देऊनही पाणी सोडत नसतील तर सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का ? पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडा. या भागातील ऊस नगर जिल्ह्यातील नेत्यांच्या कारखान्यांना चालतो, मग पाणी द्यायला विरोध का ? राजेश टोपे, आमदारमराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सरकारकडे प्रश्न मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी राजकीय हेतूने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजकारणासाठी कुणी अडवणूक करीत असेल तर योग्य नाही. पाणीप्रश्न सुटणार नसेल तर सर्व आमदार हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार घालतील. संजय शिरसाट, आमदार