महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार:मुंबईत भाजपची प्रचंड ताकद, खासदार नारायण राणे यांचे मोठे विधान
![महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार:मुंबईत भाजपची प्रचंड ताकद, खासदार नारायण राणे यांचे मोठे विधान](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/01/09/untitled-design-2025-01-09t194826141_1736432298.jpg)
भाजप खासदार नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकांवर मोठे विधान केले आहे. आम्ही भविष्यात स्वबळावर लढू. पण कोणती हे सांगू शकत नाही, असे विधान नारायण राणे यांनी केले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार अशी चर्चा सुरू आहे. अशात नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. नारायण राणे म्हणाले, आम्ही भविष्यात निवडणुका स्वबळावर लढू. पण कोणती हे सांगू शकत नाही. कोणतेही खाते सांभाळण्यासाठी नीतेश राणे सक्षम आहेत. ज्याने बांगलादेशीला जन्माचा दाखला दिला, त्या अधिकार्यावर कारवाई व्हावी. राजन साळवी मार्गावर असल्यास पक्ष विचार करेल, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. पुढे बोलताना शरद पवार यांच्याविषयी बोलताना नारायण राणे म्हणाले, शरद पवारांचे आरएसएसने कौतुक केल्यास त्यात वावगे काही नाही. भाजपचे चांगले दिवस आले त्याचे तुम्ही स्वागत केले पाहिजे. लोकांना विकास दिसत आहे. त्यामुळे पक्षप्रवेश होत आहेत. मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल. मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे. तसेच पुढे ते म्हणाले कोणत्या भागात, कोणती इंडस्ट्री उभारावी याबाबत उदय सामंत आणि माझ्यात चर्चा झाली असल्याची माहिती देखील यावेळी नारायण राणे यांनी दिली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढली होती. यात त्यांना प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीमध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे भाजप पक्षाला मिळाले आहे. त्यामुळे भाजपची महाराष्ट्रात चांगली पकड बनली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.