राज्यात मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष:अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर; तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा नाना पटोलेंचा दावा
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांबाबत दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणत बारामतीत पोस्टर लावण्यात आले आहेत. अजित पवार हे बारामतीतून विधानसभा निवडणूकही लढवत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या छावणीत मुख्यमंत्र्यांबाबत खडाजंगी सुरू झाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. ट्रेंडवरून काँग्रेसला जास्त जागा मिळतील असे दिसते. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. पटोले यांचे हे विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फारसे आवडलेले नाही. या संबंधी राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, परंतु आघाडीचे सर्व घटक पक्ष मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरवतील. मी किंवा कोणीही या बाबत एकटा निर्णय घेणार नाही. जर काँग्रेस हायकमांडने पटोले यांना तुम्हीच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले असेल तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधी – वाड्रा यांनी त्याची घोषणा करावी, असेही राऊत यांनी म्हटले आहे. एकाच दिवसात आघाडीच्या 2 बैठका, काँग्रेसची आज स्वतंत्र बैठक निकालापूर्वी गुरुवारी सायंकाळी संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यानंतर तिन्ही नेते एकाच गाडीत बसून मातोश्रीवर पोहोचले. रात्री उशिरा मातोश्रीवरही बैठक झाली. आज महाराष्ट्र काँग्रेसही आपली स्वतंत्र बैठक घेऊ शकते. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी लहान पक्ष आणि काही अपक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात 66% मतदान, हे 2019 पेक्षा 5% जास्त महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. मतदानाची अंतिम आकडेवारी आली आहे. यावेळी, ईव्हीएमद्वारे 66% मतदान झाले, जे 2019 च्या 61.1% मतदानापेक्षा 5% जास्त आहे. कोल्हापुरात सर्वाधिक 76.6% मतदान झाले. त्याच वेळी, झारखंडमध्ये एकूण 67.74% मतदान झाले, जे 2019 च्या निवडणुकीच्या आकडेवारीपेक्षा 1.65% जास्त होते. येथे झारखंडमधील 81 जागांपैकी 68 जागांवर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. शिवसेना ठाकरे गटाचा दावा – एक्झिट पोल ही सर्वात मोठी फसवणूक संजय राऊत यांनी एक्झिट पोल नाकारत ते खोटे असल्याचे म्हटले आहे. आघाडी सरकार स्थापन करेल आणि 160 जागा जिंकेल असा दावा त्यांनी केला. राऊत म्हणाले की, एक्झिट पोल या देशातील मोठे खोटे आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान एक्झिट पोलचे आकडे 400 ओलांडलेले आम्ही पाहिले. हरियाणाच्या निवडणुकीत काँग्रेसचा आकडा 60 ओलांडताना दिसला. वास्तविक, दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र, महाराष्ट्रात 11 पैकी 6 एक्झिट पोलने भाजप आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित 4 एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीला म्हणजेच महाविकास आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर एका अंदाजानुसार यंदा त्रिशंकू विधानसभा राहणार आहे. आघाडीमध्ये उद्धव यांची शिवसेना कमकुवत, विदर्भात काँग्रेस आघाडीवर 2019 च्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर राहिलेली काँग्रेस यावेळी त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा वरचढ दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकून आश्चर्याचा धक्का दिला. विदर्भातील 62 जागांपैकी काँग्रेस 50च्या आसपास जागा जिंकू शकते. काँग्रेसने आघाडीत सर्वाधिक 101 उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीचा दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेना उद्धव गट हा सर्वात कमकुवत ठरू शकतो. पक्षाने 95 उमेदवार उभे केले आहेत. यापैकी फक्त एक तृतीयांश जिंकण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा मजबूत दिसत आहे. या पक्षाला मराठा मतांचा फायदा मिळू शकतो.