समीर यांना त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत- एजाज खान
एजाज खान १९ मे रोजी तुरुंगातून बाहेर आला. जवळपास २६ महिने तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला की, ‘समीर वानखेडेंला आज त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यांनी जे दु:ख इतरांना दिले, तेच आज त्यांना परत मिळत आहे.’
एजाज म्हणाला- मी दयेची याचना केली होती, पण त्यांनी दया दाखवली नाही
तुरुंगात राहिल्यामुळे मला खूप त्रास सहन करावा लागला, एक वेब सीरिज हातून गेली. २६ महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला, असा प्रश्न एजाजला विचारण्यात आला. याला उत्तर देताना एजाज म्हणाला, ‘तुरुंगात गेल्यानंतर आता मी कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो. मी एसीशिवाय राहू शकतो. तथापि, व्यावसायिकदृष्ट्या मला या वर्षांत खूप त्रास सहन करावा लागला. वेब सीरिज माझ्या हातातून गेली.
‘मी तुरुंगात होतो आणि माझा ९ वर्षांचा मुलगा मनोचिकित्सकाकडे थेरपीसाठी जात होता.. तुरुंगात गेल्यानंतर सहा महिने मी त्याला भेटू शकलो नाही. ईद किंवा बायको-मुलांच्या वाढदिवसाला मला खूप एकटं वाटायचं. तुरुंगात गेल्यानंतर मी भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडलो होतो.
तुरुंगात चांगले जेवण मिळत नव्हते, झोपायला जागा नव्हती
एजाज खानला त्याच आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते जिथे संजय दत्तने शिक्षा भोगली होती. कारागृहाच्या दुरवस्थेबाबत बोलताना तो म्हणाला की, ‘आपण कैद्यांच्या मानवी हक्कांबद्दल बोलतो, पण तसे काहीच नाहीये. तुरुंगात कैद्यांची संख्या खूप जास्त होती. तिथलं जेवणही चांगलं नव्हतं, झोपायलाही जागा नव्हती. ८०० क्षमतेच्या कारागृहात ३ हजार ५०० कैदी होते.
जोपर्यंत या देशात न्याय मिळत नाही तोपर्यंत जनजीवन विस्कळीतच राहणार
एजाज सध्या जामिनावर बाहेर आहे. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तो म्हणाला की, ‘या देशात न्याय खूप उशिरा मिळतो. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त होते. मला न्याय मिळेल हे मला माहीत आहे. मी काही केले नाही हे माझ्या घरच्यांनाही माहीत आहे.’