चंदिगढ: मजुराच्या बँक खात्यात अचानक २०० कोटी रुपये जमा झाले. पोलीस चौकशीसाठी मजुराच्या घरी पोहोचले. त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. मजुराच्या खात्यात आलेली मोठी रक्कम पाहता गुजरात पोलिसांनी त्याचं खातं गोठवलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.हरयाणाच्या चरखी-दादरीत वास्तव्यास असलेल्या आठवी पास विक्रमच्या खात्यात एकाएकी २०० कोटी रुपये जमा झाले. इतकी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्यानं संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. विक्रमच्या खात्यात २०० कोटी रुपये कोणी पाठवले त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. विक्रमच्या खात्यातून मोठा घोटाळा सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी येस बँकेकडे तक्रार केली होती. येस बँकेत आपल्या नावे खातं कोणी उघडलं आणि त्यात इतकी मोठी रक्कम कोणी जमा केली, याबद्दल विक्रम पूर्णत: अनभिज्ञ आहे.विक्रमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. घरी उत्तर प्रदेश पोलीस येऊन गेले. कुठून ना कुठून फोन येत आहेत. माझ्या खात्यातले २०० कोटी रुपये हडपण्यासाठी कोणीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल अशी भीती विक्रमनं बोलून दाखवली. आम्हाला हे पैसे नकोत. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास करावा. पैसे सरकारनं स्वत:कडे घ्यावेत. पण आमचा जीव सुरक्षित राहावा, असं गाऱ्हाणं त्यांनी मांडलं.उत्तर प्रदेश पोलीस घरी चौकशीसाठी आले. त्यांनी बँक खात्याचा नंबर मागितला. त्यांनी पडताळणी केली असता खात्यात कोट्यवधी रुपये सापडले. मला त्या खात्याबद्दल, त्यातील पैशांबद्दल कोणतीही कल्पना नाही. या प्रकरणामुळे माझं संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे, असा घटनाक्रम विक्रमनं कथन केला. पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेऊन सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. विक्रमनं घोटाळा केल्याचा आरोप पोलिसांनी केला. विक्रमला ताब्यात घेण्यासाठी कोर्टाची नोटीस किंवा वॉरंट आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांनी पोलिसांना केला. तेव्हा पोलिसांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यामुळे विक्रमची अटक टळली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *