म. टा. प्रतिनिधी, मुंबईः दहीहंडी उत्सवात गंभीर जखमी झालेल्या करीरोड येथील गोविंदाचा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संघर्ष सुरूच आहे. प्रथमेश सावंत असे त्याचे नाव असून गेला एक महिन्याहून अधिक काळ त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या उपचारांतून बरा होऊन प्रथमेश चालू-फिरू शकेल, अशी आशा त्याचे नातलग बाळगून आहेत. त्यासाठी ते प्रार्थना करत आहेत.

यंदा राज्य सरकारने सर्व निर्बंध उठविल्याने मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला. मात्र त्यामध्ये काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या. यातील काही गोविंदांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. मात्र करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा संघर्ष महिन्यानंतरही सुरूच आहे. दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला. त्याच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातून प्रथमेशच्या कमरेखालील भागातील संवेदना बाधित झाल्या आहेत. त्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रथमेशला सध्या त्याच्या पायावर उभे राहणे शक्य नाही. त्याच्या पायांना अद्यापही संवेदना जाणवत नाहीत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला आणखी काही महिने उपचारांची आवश्यकता भासेल, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच तो स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर यातून पूर्णपणे बरा होईल, अशी आशाही कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

‘प्रथमेशला ट्रॅक्शन दिले होते ते काढण्यात आले आहे. हात आणि पायाला अजूनही कमजोरी आहे. तसेच पायाला अद्याप संवेदना जाणवत नाहीत. आठवडाभरात त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात येईल. सद्यस्थितीत व्हीलचेअरच्या सहाय्यानेच त्याला राहावे लागणार आहे’, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता संगीता रावत यांनी दिली.

प्रथमेशला सरकारने घोषित केलेली मदत मिळावी.

दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन करताना सरकारने लोकप्रिय घोषणा केल्या. त्यातून यंदा प्रचंड उत्साहात गोविंदा बाहेर पडले. यातील काही गोविंदा जखमी झाले. या जखमींना अद्याप मदत मिळालेली नाही. सद्यस्थितीत प्रथमेश स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नसल्याची स्थिती आहे. तसेच त्याला आई-वडील नाहीत. नातलगांची आर्थिक स्थितीही बेताचीच आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जखमी गोविंदा प्रथमेश सावंत याला ७ लाख ५० हजार रुपयांची मदत केली जावी. त्याला ही मदत तातडीने मिळण्याची गरज आहे, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे.

‘सरकारने मदत द्यावी’

काही वर्षांपूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरपलेला प्रथमेश चुलत्यांकडे वास्तव्याला आहे. आयटीआयचे शिक्षण घेतानाच डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविण्याचे कामही तो करत होता. त्याच्यावर आणखी काही महिने उपचार करावे लागणार आहेत. पुढील उपचारांचा खर्च मोठा असणार आहे. त्यासाठी सरकारने मदत द्यावी, अशी त्याच्या नातलगांची मागणी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.