: सर्वोच्च न्यायालयातील महिला वकिलाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. महिलेची हत्या झालेल्या बंगल्यात असलेल्या स्टोअर रुममध्येच तो लपून बसला होता. रात्री ३ वाजता पोलिसांनी त्याला स्टोअर रुमच्या बाहेर काढलं. आरोपी पती हत्या करुन स्टोअर रुममध्ये लपून बसला होता. २४ तास तो तिथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.नोएडाच्या सेक्टर ३० मधील डी-४० बंगल्यात राहणाऱ्या रेणू सिन्हा यांचा मृतदेह रविवारी बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला. ६१ वर्षांच्या रेणू सिन्हा सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करायच्या. त्यांची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा बाथरुममधील दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. रेणू यांचा मृतदेह रक्तानं माखलेल्या स्थितीत पडलेला होता. आसपासही रक्त सांडलेलं होतं. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तपास सुरू झाला.रेणू यांच्यावर त्यांच्याच पतीनं हल्ला केल्याचा आरोप रेणू यांच्या कुटुंबियांनी केला. हत्येनंतर रेणू यांचा पती फरार होता. त्याचा तपास पोलीस करत होते. त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. त्यामुळे संशयाची सुई त्याच्याचकडे होती. काल रात्री रेणू यांच्या पतीला अटक झाली. हत्येनंतर तो बंगल्यातील स्टोअर रुममध्ये लपून बसला होता. पोलिसांनी रात्री ३ वाजता त्याला बाहेर काढलं. तो २४ तास स्टोअर रुममध्येच लपला होता. आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये बंगल्यावरुन वाद सुरू होता. त्याच वादातून पतीनं रेणू सिन्हा यांना संपवलं. दोघांमध्ये अनेक महिन्यांपासून भांडण सुरू होतं. रेणू फोन उचलत नसल्याची माहिती त्यांच्या भावानं पोलिसांना कळवली. काहीतरी अनर्थ घडल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यानंतर पोलीस बंगल्यावर पोहोचले. तेव्हा त्यांना रेणू यांचा मृतदेह बाथरुममध्ये सापडला. पोलिसांनी रेणू यांच्या पतीला कॉल करुन पाहिला. पण त्याचा फोन बंद होता.