म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घुसून समाजकंटकांनी शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. या हिंसाचारात मराठा आंदोलक नसूनही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ११ कोटींची नुकसान भरपाई वसूल करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. ही नुकसान भरपाई राज्यातील मराठा समाज जमा करून देईल. त्यातूनही रक्कम उभी होत नसेल तर १११ बांधव स्वत:ची किडनी विकून शासनाला नुकसान भरपाई देईल. शासनाने आता बॅंक खाते क्रमांक द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाचे सदस्य प्रा. चंद्रकांत भराट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मराठा समाजाचा आरक्षण मिळविण्यासाठी १९८२ पासून संघर्ष सुरू आहे. समाजाने शांततेत ५८ क्रांती मोर्चे काढले होते. त्यात कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही. मराठा आरक्षणासाठी ६५ जणांनी बलिदान दिले आहे. अंतरवाली येथे मनोज जरांगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. त्यानंतर झालेल्या आंदोलनात शासनाने २०० जणांवर ३०७ सारखे गुन्हे दाखल केले आहेत. तर ११ कोटींचे नुकसानही वसूल करण्याची भाषा वापरली. हा प्रकार चुकीचा आहे, असे भराट म्हणाले. निश्चित कालमर्यादेत कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्यास आंदोलन उभे करण्याचा, इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. यावेळी अभिजीत देशमुख, सुनिल कोटकर, सुरेश वाकडे, सुकन्या भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या व्हायरल झालेल्या ध्वनीफितीतील संवाद मंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचे वक्तव्य जातीय तेढ वाढविणारे आहे, असे प्रा. भराट म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *