सोलापूर शहरातील महाविद्यालय परिसरात फ्रुट बियरच्या बनावट बाटल्या विक्री होत आहेत. दोन बाटल्या प्लायल्या की जबरदस्त गुंगी चढते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बियर, व्हिस्की, रम या दारूचे व्यसन लागण्याअगोदर तरुण पोर बनावट फ्रुट बियरपासून सुरुवात करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सकाळी सोलापूर शहरातील अशोक चौक परिसरात एका मालवाहतूक रिक्षातून १८ हजार रुपये किमतीची फ्रुट बिअर वाहतूक होताना जप्त केली आहे. कारवाई वेळी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. अल्ताफ सगरी (३२) आणि गौस अलीशेर बागवान (३१) दोघेही राहणार सरवदे नगर, मुळेगाव रोड सोलापूर, हे दोघे संशयित इसम मालवाहतूक रिक्षामधून युनिक ड्रिंक्स कंपनीचे फ्रुट बिअरच्या ६५० मिली क्षमतेच्या सहाशे सीलबंद बाटल्या वाहतूक करताना आढळून आले.
बाटल्याची पाहणी केली असता सोलापूर शहराजवळ असलेल्या मुळेगाव रोडवरील एका शीतपेयच्या कारखान्यात फ्रुट बियर तयार केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी संबंधित कारखान्याचे सर्व कागदपत्रे तपासून कारखान्यातील सर्व मुद्देमाल जप्त करत आहेत. जप्त केलेला मुद्देमाल प्रयोगशाळेकडे उत्तरीय तपासणीसाठी पाठवणार आहेत. राज्यभर अशा बनावट फ्रुट बियर कुठेही आढळल्या नाही. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी माहिती देताना सांगितले, राज्यातील विविध जिल्ह्यात काम केले. परंतु सोलापुरात पहिल्यांदाच बनावट फ्रुट बियरचा धंदा पाहायला मिळाला आहे. फक्त बोली भाषा म्हणून रासायनिक पदार्थांच्या शीतपेयांना सोलापुरात फ्रुट बियर म्हणून संबोधले जात आहे.
जप्त केलेल्या बाटल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या फळांचा वापर केला नाही. या रासायनिक शितपेयात जवळपास दोन टक्के अल्कोहोल आहे. एखाद्या तरुणाने सलग दोन बाटल्या प्यायल्या की जबरदस्त नशा होते. फ्रुट बियरच्या नावाखाली भलताच उद्योग करून सोलापूरच्या तरुणांना व्यसनी केले जात आहे. ही कारवाई निरीक्षक राहुल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी आणि शोएब बेगमपूरे यांच्या पथकाने पार पाडली. सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील फ्रुट बियरचे बनावट कारखाने उध्वस्त करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.