मणिपूरमध्ये महिलेवर हल्ल्यानंतर तणाव; दोन शेजारी गावांत लावली संचारबंदी:कांगपोक्पी जिल्ह्यात तणाव, कामजोंग जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या कॅम्पवर हल्ला

मणिपूरच्या कांगपोक्पी जिल्ह्यातील कंसाखुल आणि लेइलोन वाफेई या दोन शेजारच्या गावांमध्ये शनिवारी कर्फ्यू लागू करण्यात आला. दोन्ही गावे आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या हालचालींवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. एका गावातील कुकी तरुणाने दुसऱ्या गावातील नागा महिलेवर हल्ला केल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी कामजोंग जिल्ह्यातील होंगबाई भागात जमावाने आसाम रायफल्सच्या तात्पुरत्या उभारलेल्या कॅम्पवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवानांनी घराच्या बांधकामासाठी काही लोकांना लाकूड नेण्यापासून रोखले होते. याचा त्यांना राग आला. त्यामुळे त्यांनी जवानांवर हल्ला केला. जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून कुकी आणि मैतेई समुदायांमधील वांशिक हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारात २५० हून अधिक लोक मरण पावले. तसेच हजारो बेघर झाले आहेत. प्रशांतकुमार सिंह होऊ शकतात मुख्य सचिव वरिष्ठ आयएस प्रशांतकुमार सिंह मणिपूरचे मुख्य सचिव बनू शकतात. १९९३ च्या बॅचचे असलेले सिंह यांना मणिपूर सरकारच्या विनंतीवरून त्यांच्या मूळ केडरमध्ये परतण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या ते नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात सचिव आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment