दहशतवाद्यांची नवी चाल; गनिमी युद्धाचे प्रशिक्षण, शस्त्रेही बदलली:स्थानिक भरतीही टाळू लागले, गाेपनीय माहितीचा दावा, जम्मू-काश्मिरात परदेशी दहशतवादीही लपले
आॅक्टाेबरमध्ये बारामुल्ला पाेलिसांना दहशतवाद्यांबद्दलचा नवा सुगावा हाती लागला आहे. एका दुर्गम गावात जंगलाजवळील दुकानाचा दरवाजा रात्री दहशतवाद्यांनी ताेडला. खाद्यपदार्थ आणि रेशनचे इतर साहित्य त्यांनी माेठ्या प्रमाणात लुटले. सामानापेक्षा जास्त रुपये ते डब्याखाली ठेवून गेले. दुकान लुटण्याची ही पंधरा दिवसांतील दुसरी घटना हाेती. किश्तवाडमधील चकमकीत रात्रभर दहशतवाद्यांनी केवळ ६ वेळा गाेळीबार केला. सगळे पिन पाॅइंट निशाण्यावर हाेते. दहशतवाद्यांनी ६ फैऱ्यांतून संपूर्ण रात्र सुरक्षा दलास गुंगवले आणि ते सकाळी जंगलात गायब झाले. या दाेन घटना जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानातून घुसलेल्या दहशतवाद्यांच्या बदललेली रणनीती दर्शवणाऱ्या आहेत. एक म्हणजे स्थानिक दहशतवाद्यांची भरती केली जात नाही किंवा स्थानिक मदत देणारेही नेमले जात नाहीत. सगळ्या गाेष्टी ते स्वत: करू लागले आहेत. दुसरे म्हणजे प्रशिक्षण, शस्त्रे, संवाद साधनेही उच्च पातळीवरील आहेत. विविध संस्थांच्या इनपुट आधारे जम्मू-काश्मीरमध्ये १२५ परदेशी दहशतवादी असल्याची माहिती आहे. अलीकडच्या वर्षांतील ही घुसखाेरीची माेठी घटना आहे. दीड दशकांनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची हजेरी आहे. एक पाेलिस अधिकारी म्हणाले, दरवर्षी एप्रिल-जुलै व आॅक्टाेबरमध्ये ५० ते ७० दशतवादी घुसखाेरी करतात. तेवढेच स्थानिक दहशतवादी असायचे. यावेळी स्थानिक खूप कमी आहेत. स्थानिक लाेकांमध्ये मुळीच नाही. दहशतवाद्यांचा सर्वाधिक कारवाया साेपाेर-बारामुल्ला येथे आहेत. गुप्तचर यंत्रणेनुसार येथे सुमारे ३० दहशतवादी दडून बसलेले आहेत. बालामुल्ला-पट्टन-किरिरी पट्टीमध्ये १० आणि साेपाेरमध्ये २० पेक्षा जास्त परदेशी दहशतवादी आहेत. बांदीपुरा-हाजिनमध्ये ही संख्या १८ वर आहे. शाेपियां-कुलगाममध्ये १८ ते २०, पुलवामा-१०-१५, कुपवाडा व अनंतनागमध्ये १० हून जास्त परदेशी दहशतवादी आहेत. जम्मू विभागात ४५-५० परदेशी दहशतवादी सक्रिय सांगितले जातात. दीड दशकांपासून शांत जम्मूच्या भागातही दहशतवाद दिसू लागला आहे. रियासी, कठुआ, पुंछ, सांबा, रामबन व डाेडा-किश्तवाडमध्ये दहशतवादी हालचालींचे वृत्त सातत्याने येत आहे. जम्मू- काश्मीर नजीकच्या हिमाचल व पंजाबमधील काही जिल्ह्यांतही घुसखाेरीचे वृत्त आहे. काश्मीरमध्ये मुख्यत्वे तीन दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. जैश-ए-माेहंमद, लष्कर-ए-ताेयबा, हिज्बुल मुजाहिदीन. जैशने काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ले केले. जम्मूच्या भागात दाेन वर्षांत झालेल्या घुसखाेरीमागे जैश आहे. काश्मीरमधील घुसखाेरी ताेयबा व जैश यांची संयुक्त आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जैश पुन्हा पाय पसरू लागले आहे. त्यामुळे ही बाब सुरक्षा दलासाठी चिंतेचा विषय ठरते.
शस्त्रे : अमेरिकी सैन्यातील असॉल्ट रायफलचा वापर, ड्रोननेही पुरवठा काही दिवसांपूर्वी दहशतवादी एके रायफल बाळगत.आता त्यांना तालिबानकडून अमेरिकन सैन्यातील एम-४ कार्बाइन असॉल्ट रायफल मिळाल्या आहेत. नाईट व्हिजन, रॉकेट लाँचर, आधुनिक शस्त्रेही आहेत. ड्रोननेही सीमेपलीकडून शस्त्रे पोहोचवतात. परिणाम … दहशतवादी कमी खर्च करून सुरक्षा दलांवर अचूक हल्ले करतात. त्यानंतर सहजपणे पळून जाण्यातही यशस्वी होतात. सुरक्षा दलाची मोठी समस्या : खबऱ्यांची धरपकड झाल्याने नेटवर्क संपुष्टात आले कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची मोठी धरपकड झाली होती. पोलिसांची गुन्हे प्रतिबंधक शाखा, आयबी, लष्करी गुप्तचर संस्था यांच्या समन्वयाच्या अभावामुळे हेर पकडले गेले. त्यामुळे खबऱ्यांचे जाळेच संपुष्टात आले. त्यादरम्यान तांत्रिक व्यवस्थेद्वारे दहशतवाद्यांचे लोकेशन समजू लागले. २०२०-२१ मध्ये यातून ४०० हून जास्त दहशतवादी ठार झाले. नंतर खबऱ्यांना फारसे महत्त्व दिले गेले नव्हते. परिणाम.. दहशतवाद्यांच्या हालचाली, रेशन पुरवठा व अड्ड्यांची अचूक माहिती मिळवण्यात आता अडथळे. तयारी : पाक सैन्याकडून कमांडोसारखे प्रशिक्षण, गनिमी युद्धाचाही अनुभवजैश-ए-मोहंमद व लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना पाक सैन्यातील कमांडो फोर्स एसएसजीचे माजी अधिकारी प्रशिक्षण देतात. त्यापैकी अनेकांनी अफगाणमध्ये अमेरिकी सैन्याविरुद्ध गनिमी युद्ध केले आहे. या वेळी अशा प्रशिक्षितांनी घुसखोरी केली आहे. परिणाम … भारतीय सैन्यावर सापळा रचून हल्ले केले जात आहेत. गुलमर्ग, डेरा गली, थानामंडी येथे लष्करी वाहनांना लक्ष्य केले गेले. संवाद : कमांडरशी बोलण्यासाठी चिनी उपकरणातून इन्क्रिप्टेड डेटा पाठवतात सीमापार कमांडर किंवा आपसांत संवाद साधण्यासाठी दहशतवादी चिनी उपकरणांची मदत घेत आहेत. ते अल्ट्रा फ्रिक्वेन्सीवर काम करतात. दहशतवाद्यांजवळ आढळलेल्या ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये डेटा बंडलमध्ये जातो. त्याचे इन्क्रिप्शन भेदणे आव्हानात्मक असते. परिणाम … इनक्रिप्टेड डेटाद्वारे सुरक्षा दलांचे तांत्रिक इनपुट घटले. दहशतवादी सहा महिने ते २ वर्षांत संवाद पद्धतीत बदल करतात. स्थानिकांशी कमी संपर्क : अॅपने रस्ते शाेधू लागले, रेशनसाठी दुकानांची लूट दहशतवादी स्थानिकांशी कमीत कमी संपर्क ठेवू लागलेत. रेशनसाठी दुकानांची लूट करतात. जंगलात सातत्याने लाेकेशन बदलत आहेत. गिर्याराेहकांच्या अॅपद्वारे जंगलात मार्गांचा शाेध घेतात. नजरेस पडू नये म्हणून दाेन-चार अतिरेकी साेबत असतात. परिणाम…लाेकांपासून अंतर अतिरेक्यांसाठी फायद्याचे ठरले आहे. माेठ्या घुसखाेरीनंतरही सुरक्षा दलाकडे ठाेस इनपुट कमी. दिशाभूल व्हावी म्हणून जम्मूत हल्ले कलम ३७० हटवल्यानंतर सुरक्षा दलाने ऑपरेशन आॅल आऊट राबवले. त्यात अतिरेक्यांसह आश्रय देणाऱ्यांची व्यवस्थाच नष्ट केली गेली. त्यामुळे दहशतवादी जवळपास संपले. त्यानंतर दहशतवाद्यांनी रणनीती बदलली. काश्मीरमध्ये हायब्रिड मिलिटन्सी व टार्गेट किलिंग सुरू केले. सुरक्षा दलाने हेदेखील सहा महिन्यांत नियंत्रणात आणले. पुढे दहशतवादी संघटनांनी पुन्हा रणनीती बदलली. १५ वर्षांपासून शांत जम्मू भागात घुसखोरी करून हल्ले केले. ही कृती भारतीय सैन्याची दिशाभूल करण्याची रणनीती होती. म्हणजे काश्मीर व चिनी सीमेवरील दबाव कमी व्हावा, असा त्यांचा मनसुबा होता. जम्मू सैन्य अभियान वाढताच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठी घुसखोरी सुरू झाली. पाकमधील दहशतवादी म्होरक्यांना काश्मीरमधील शांतता पचत नाही. ते त्यात विष कालवू पाहत आहेत. घुसखोरीचा मार्ग बांदीपुरा: लाँच पॅड: तारबल, मार्ग: तारबल ते छानदजी; लाँच पॅड: केल, मार्ग : केल ते अरिन मार्गे शोकबाबा. हंदवाडा… लाँच पॅड: अठमुकाम ज़ुरा, मार्ग: नवगाम ते बडी बहक-हर्फदा; लाँच पॅड: लीपा, मार्ग : गबीडोरी नाला ते राजवाडा जंगल बारामुला… लाँच पॅड: गुज्जर बंदी, मार्ग: काला पहाड ते विजटॉप; लाँच पॅड: तुरां नाला, मार्ग : गवहास डोक ते घोडाथाल कुपवाडा… लाँच पॅड: दुंधीयाल, मार्ग: कोनागाबरा ते तंगधार मार्गे जूनऋषी.