गेले ते जाऊद्या, पण जे अस्सल आणि निखाऱ्यासारखे शिवसैनिक माझ्यासोबत राहिले आहेत, तेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपण नव्या पक्षचिन्हासह लढण्यास तयार असल्याचं आपल्या राजकीय विरोधकांना सांगितलं आहे.
दरम्यान, ‘संजय राऊत आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काश्मीरला गेले होते. तिथेही ५० खोके एकदम ओके ही घोषणा पोहोचली आहे. देशभरात सगळीकडे या घोषणेची चर्चा झाली. महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरूणाखाली जे लांडगे घुसले होते, ते विकले गेले. त्यातून महाराष्ट्राची आणि शिवसेनेचीही बदनामी झाली आहे,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ठाण्यातील आरोग्य शिबिराला सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी आपला मुख्यमंत्रिपदी असतानाचा अनुभवही सांगितला. ‘आज मी जास्त राजकीय बोलणार नाही. मात्र मी मुख्यमंत्री असताना जगावरच एक विचित्र संकट आलं होतं. त्या संकटात कारभार करणं कठीण होतं. मात्र तुम्ही सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं. त्या काळात सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे आपण बंद केली होती. तेव्हा काही जण मला विचारायचे की आम्हाला मंदिरात आणि आमच्या प्रार्थनास्थळांमध्ये का जाऊ दिलं जात नाही. त्यावर मी सांगायचो की जो देव आपल्याला मंदिरात भेटतो, तोच देव आताच्या स्थितीत डॉक्टर आणि नर्सच्या रुपात आपले प्राण वाचवायला आला आहे,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.