आरोपी शरण आल्यानंतर टीका करणे योग्य नाही:चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला, म्हणाले – तपास यंत्रणांवर कोणतेही दडपण येणार नाही
आरोपी शरण आल्यानंतर टीका करणे योग्य नाही. बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मस्साजोग ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनावर प्रतिक्रिया देत सरकारवर विश्वास ठेवावा, अशी विनंती मस्साजोगच्या ग्रामस्थांना केली. बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड 22 दिवसांपासून फरार होता. तो मंगळवारी पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. फरार आरोपीला अटक न होता, तो स्वतःहून शरण आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल, तर त्यावर टीका करणे योग्य नाही. कालपर्यंत आरोपीला पकडत नाही, असे म्हणत होते. आता तो शरण आला, तर त्यावरही टीका करतात, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना लगावला. तपास यंत्रणांवर कोणतेही दडपण येणार नाही, असेही ते म्हणाले. बीडच्या प्रकरणातील कोणताही आरोपी सुटणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, असे ते म्हणाले. सरकारला वेळ द्यावा लागतो
योग्य पद्धतीने पुरावे, चार्जशीट तयार करावे लागते. गुन्हा दाखल करण्यापेक्षा तो पूर्णपणे निकाली निघणे महत्त्वाचे आहे. सर्व तपास यंत्रणांच्या माध्यमातून जे पुरावे येतील, त्यातून आरोपीला शिक्षा होईल. तपास असा व्हावा की, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. म्हणून सरकारला काही वेळ लागतो. तो द्यावा लागतो, असे बावनकुळे म्हणाले. सुरेश धसांना अप्रत्यक्षपणे दिला सल्ला
कोणत्याही प्रकरणात काय कारवाई झाली, सरकारने काय पुढाकार घेतला, हे आमदारांनी जाणून घेतले पाहिजे. तपासात काही आणखी अॅडिशन करायचे असेल, तर मीडियामध्ये बोलण्यापूर्वी मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांशी त्याबाबत चर्चा करायला हवी. यातून चांगले मार्ग निघू शकतात. योग्य तपासही होऊ शकतो, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे. ग्रामस्थांनी तपास यंत्रणांना मदत करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट आणि योग्य पद्धतीने तपासाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी देवेंद्रजी आणि आमच्या सरकारवर विश्वास ठेवावा. कुठलाही पुरावा सुटणार नाही, यासाठी ग्रामस्थांनी तपास यंत्रणांना मदत करावी, अशी विनंती बावनकुळे यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना केली आहे. हे ही वाचा… मस्साजोग ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन:फरार आरोपींना 10 दिवसांत अटक करण्याची पोलिस अधीक्षकांनी दिली ग्वाही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सर्व गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन चालले. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे पोलिस अधीक्षक नवीन कॉवत यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. सविस्तर वाचा… वाल्मीक कराडचा पाय खोलात!:कोर्टात 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादी, देशमुखांचा मारेकरी सुदर्शन हा त्याचा साथीदार असल्याचा दावा बीडच्या मस्साजोग हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा वाल्मीक कराड अखेर सीआयडीच्या जाळ्यात सापडला आहे. त्याला मंगळवारी रात्री उशिरा केज कोर्टात हजर करण्यात आले. तिथे त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. यावेळी झालेल्या युक्तिवादात सरकारी वकिलांनी वाल्मीक कराडच्या 1999 पासूनच्या गुन्ह्यांची यादी सादर केली. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचा दावा केला जात आहे. सविस्तर वाचा…