नाशिक: राज्यभरात सातत्याने सुरु असलेले रस्ते अपघात हा चिंतेचा विषय ठरत असतानाच नाशिकच्या चांदवड येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील हा अपघात घडला. येथील नमोकार तीर्थक्षेत्रानजीक एका कारची आणि कंटेनरची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, यामध्ये कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये धुळे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा समावेश आहे.

Nashik Chandwad Accident: भरधाव कार-कंटेनरचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू; भाजप नगरसेवकाचा समावेश

किरण अहिरराव आणि त्यांचे मित्र हे नाशिकवरुन धुळ्याच्या दिशेने जात होते. नमोकार तीर्थक्षेत्राच्या परिसरातून जात असताना सकाळी सात वाजता त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. कारच्या बोनेटपासून मागच्या सीटपर्यंतचा कारचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला आहे. तर धडकेनंतर या कारचे छप्परही पूर्णपणे उखडले गेले आहे. या गाडीचा अवस्था पाहून या अपघातात कोणीही वाचण्याची शक्यता कमीच होती. या दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये किरण हरिश्चंद्र अहिरराव, अनिल विष्णू पाटील, कृष्णाकांत चिंधा माळी आणि प्रवीण मधुकर पवार यांचा समावेश आहे. भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी वेगाने मदतकार्य करुन गाडीतून सगळ्यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *