ठाणे: टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलने प्रवास करणारी महिला आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी नराधम निशांत चव्हाण याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शहाड येथे एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती शहाड रेल्वे स्थानकावरून लोकलने टिटवाळा रेल्वे स्थानकात आली होती. स्टेशनवर उतरल्यानंतर ही महिला शेजारीच असलेल्या रुळावरून आपल्या घराकडे जात होती. यावेळी एकजण तिचा पाठलाग करत होता. पीडित महिला फोनवर आपल्या पतीशी बोलत असल्यामुळे ती गाफील होती. पाठलाग करणाऱ्या त्या नराधमाने तिला जबरदस्तीने रुळालगत असलेल्या झुडुपात ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. याच दरम्यान पीडित महिलेचा फोन सुरूच होता. दरम्यान या घटनेची कुठे वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी या नराधमाने त्या महिलेला दिली. घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने लगेचच घडला प्रकार याच परिसरात राहणाऱ्या लोकांना फोन करून सांगितला आणि मदत मागितली. तात्काळ आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत या नराधमाला पकडलं. तसेच पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी निशांत चव्हाणला अटक करण्यात आली असून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत हा पडघा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. याप्रकरणी एसीपी मनोज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *