कोलंबो: आशिया कप विजेत्या भारतीय संघ वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय संघाने नुकताच आशिया कप जिंकला असला तरी संघातील दोन खेळाडू असे आहेत ज्यांच्यासाठी ही मालिका अग्निपरीक्षेसारखी असणार आहे, हे दोन खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव होय. अय्यरच्या फिटनेसवर बारीक नजर असेल तर सूर्यकुमार यादवच्या चांगल्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारतीय संघ व्यवस्थापक अय्यरच्या फिटनेसवर अधिक लक्ष देईल.आशिया कपच्या फायनलआधी अय्यरने अर्धातास फलंदाजीचा सराव केला आणि त्यानंतर १५ मिनिटे फिल्डिंगचा सराव केला होता. ज्यामुळे अय्यर श्रीलंकेविरुद्धची फायनल खेळण्याची शक्यता वाढली होती. मात्र अंतिम ११ मध्ये अय्यरला स्थान मिळू शकले नाही. संघ व्यवस्थापन त्याला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी अधिक वेळ देऊ इच्छित आहे. अय्यरने दुखापतीनंतर पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये झालेल्या साखळी फेरीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते. पाकिस्तानविरुद्ध त्याने १४ धावा केल्या होत्या. तर नेपाळविरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

भारतीय संघातील एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका त्याच्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे. अय्यरने चांगली फलंदाजी आणि पूर्णवेळ फिल्डिंग करणे गरजेचे असेल. भारतीय संघात परत आल्यानंतर तो या गोष्टी अद्याप करू शकला नाही. पण त्याचा फिटनेस सुधारत आहे आणि संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेससाठी कोणताही घाई करणार नाही.

संघातील अन्य एक फलंदाज सूर्यकुमार यादव यासाठी देखील ही मालिका महत्त्वाची असणार आहे. संघ व्यवस्थापनाने सूर्यावर विश्वास दाखवला आहे, मात्र वनडेत त्याला अद्याप चांगली कामगिरी करून दाखवता आली नाही. आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्ध सूर्याला संधी दिली होती, पण त्याला ३४ चेंडूत २६ धावा करता आल्या. तो ज्यापद्धतीने बाद झाला त्यावर संघ व्यवस्थापन नाराज असल्याचे समजते.

भारतीय संघाकडे केएल राहुल आणि ईशान किशन सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादवला लवकरात लवकर चांगली कामगिरी करून दाखवावी लागले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *