पालघर तालुक्यातील उमरोळी, सरपाडा परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या अनेक घटना घडत होत्या. उमरोळी रेल्वे पुलानाजीक पूर्वेकडे असलेल्या महावीर कॉम्प्लेक्स परिसरात ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तीन जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. संशयास्पदरीत्या फिरत असलेले हे तिघेजण चोर असल्याच्या संशयातून नागरिकांनी त्यांना ताब्यात घेत बेदम मारहाण केली. मारहाण करण्यात आलेले रमेश भंडारी (वय ३२), प्रशांत मिश्रा व चंदन मिश्रा तिघेही बेशुद्ध अवस्थेत उमरोळी स्थानकानजीक रेल्वे रुळाजवळ लोहमार्ग पोलिसांना आढळून आले.
मारहाणीत जबर जखमी झालेल्या तिघांना बोईसर येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना गुजरात राज्यातील वलसाड येथे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रमेश कालबहादूर भंडारी (वय ३२) याचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद करत पालघर पोलिसांनी हे प्रकरण पालघर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले. पालघर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून उमरोळी- सरपाडा परिसरातून विनोद पाटील, प्रफुल घरत व कुणाल राऊत अशा तिघांना अटक केली आहे.