हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे:सायनच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेवर अमित ठाकरे आक्रमक

हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे:सायनच्या चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेवर अमित ठाकरे आक्रमक

मुंबई येथील सायन कोळीवाडाच्या पंजाब कॉलनीत सोमवारी रात्री अत्यंत भयंकर घटना घडली. ड्रग्सच्या नशेत नराधमाने तीन वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला. या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून सायन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून मृत्यूशी तिची झुंज सुरू आहे. या घटनेवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे, असे म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. घडलेल्या घटनेवर अमित ठाकरे पोस्ट करत म्हणाले, सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचे प्रमाण वाढत आहे, अनेक घरे उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येते कुठून? ते पोहोचते कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरे मिळवणे आणि ड्रग्सचे नेटवर्क मोडून काढणे आता अत्यावश्यक झाले आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. मनसेने सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचे वचन दिले होते आणि आज त्या दिशेने पाऊल टाकत आहे.
सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे. जर या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आता वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र उभे राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसे उत्तर देण्याची!, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment