तीन दिवस घरातच ‘डिजिटल अरेस्ट’:घोटाळ्यात सहभाग, राष्ट्रीय मुद्दा असल्याचे सांगत शिक्षकाकडून 3 दिवसांत 13 लाख लुटले
गोंदिया जिल्ह्यातील एक शिक्षक ‘डिजीटल अरेस्ट’चा बळी ठरल्याची बाब समोर आली आहे. तुझ्यावर ठाणे येथे एफआयआर दाखल असल्याचे सांगत सायबर भामट्यांनी या शिक्षकाला लाखो रुपयांचा गंडा घातला. सायबर लुटारूंच्या टोळीने धमकावल्यानंतर जाळ्यात अडकलेल्या या शिक्षकाने स्वतःला तीन दिवस घरातील खोलीत कोंडून घेतले. भोजलाल रामलाल लिल्हारे असे या शिक्षकाचे नाव आहे. भामट्यांनी त्यांना डिजीटल अरेसस्ट करत 13 लाख 44 जार रुपये उकळले. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या आरोपीवर नवेगावबांध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोजलाल लिल्हारे हे मध्यप्रदेशातील बालाघात जिल्ह्यातील लवेरी येथील रहिवासी आहेत. ते सध्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांधच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 26 डिसेंबर रोजी भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप कॉल केला. मुंबई येथील क्राईम ब्रांचमधून पीओ प्रकाश अग्रवाल बोलत असल्याचे सांगत तुमच्यावर ठाणे येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे सांगत त्यांना ‘डिजीटल अरेस्ट’ केले. तुमच्या नावाने कॅनरा बँकेत खाते काढून त्यातून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांचा अपहार केला. या अपहाराचे 20 टक्के कमीशन तुम्हाला दिले आहे. त्यामुळे तुमच्या सर्व खात्यांची द्या. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास तुमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका होईल, असे सांगितले. यानंतर सायबर भामट्यांनी भोजलाल रामलाल लिल्हारे यांच्याकडून त्यांच्या सर्व खात्यांची माहिती घेतली. त्याची तपासणी होईल आणि आपल्याला आपला पैसा परत केला जाईल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच हा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दा आहे, कुणाला सांगू नका, अन्यथा तुमच्या कुटुंबाला धोका होऊ शकतो, असे सांगून पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. भोजलाल यांनी तीन दिवसांत 13 लाख 14 हजार रुपये ट्रान्सफर केले. यामध्ये 26 डिसेंबर रोजी 5 लाख, 27 डिसेंबर रोजी 4 लाख 68 हजार, नंतर 99 हजार, 28 डिसेंबर रोजी 2 लाख 77 हजार असे पैसे लुटले. भोजलाल यांनी पैसे पाठवल्यानंतर भामट्यांच्या सांगण्यावरून स्वत:ला स्वत:च्याच खोलीत डिजीटल अरेस्ट करून घेतले.