भोपाळ: महिलेवर पत्नीवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. क्रूर पतीनं त्याच्या पत्नीला पाण्यानं भरलेल्या विहिरीत दोरीला बांधून ढकललं. त्यानंतर स्वत:च या घटनेचं चित्रीकरण करुन व्हिडीओ सासरच्यांना पाठवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.घटना मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील आहे. जावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या किरखेडा गावात राहणाऱ्या राकेश किरचा विवाह तीन वर्षांपूर्वी राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातील उषासोबत झाला. लग्नानंतर राकेश त्याच्या पत्नीला हुंड्यासाठी त्रास देऊ लागला. तिचे हाल करु लागला. दहा दिवसांपूर्वी तर त्यानं क्रौर्याची परिसीमा ओलांडली. हुंड्याच्या हव्यासापोटी राकेशनं पत्नी उषाला विहिरीत ढकललं आणि दोरीच्या सहाय्यानं तिला लटकवत ठेवलं. महिलेनं विहिरीतून आर्जवं विनंत्या केल्या. पण पतीच्या काळजाला पाझर फुटला नाही. उलट त्यानं तिचा व्हिडीओ काढला. जीवाची भीक मागणाऱ्या पत्नीचा व्हिडीओ त्यानं सासरच्या मंडळींना पाठवला. व्हिडीओ पाहून सासरच्यांना धक्काच बसला. कुटुंबियांच्या हस्तक्षेपानंतर महिलेला बाहेर काढण्यात आली. पीडितेनं माहेरी जाऊन झालेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. तिची आपबिती ऐकून कुटुंबियांनी तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. जावद पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली. जावद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अस्लम पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीविरोधात , मारहाण आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायमूर्तींनी त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली.