तुटकर पैशांसाठी काहींनी इमान विकले:मंत्री शिरसाटांची गुलामी करण्यासाठी महापौराने शिवसेना सोडली, चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटावर घणाघात
तुटकळ पैशांच्या अमिषापोटी काही पदाधिकाऱ्यांनी आपले इमान गद्दार गटाच्या हाती विकले, अशा शब्दांत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी नंदकुमार घोडोले यांच्यावरही नाव न घेता टीका केली. मंत्र्याची गुलामी करण्यासाठी महापौराने शिवसेना सोडली, असे ते म्हणाले. तसेच शिवसेनेशी गद्दारी केलेले लोक मुख्यमंत्री झाले. परंतू त्यांना जनमानसात कधीच सन्मान मिळणार नाही, असे विधान अंबादास दानवे यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा शनिवार रोजी मेळावा पार पडला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकविण्याचा यावेळी एकमुखाने निर्धार करण्यात आला. शहरातील संत एकनाथ रंग नाट्यमंदिर येथे संपन्न झालेल्या मेळाव्याची शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली. तदनंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले. माजी आमदार उदयसिंग राजपूत, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिनेश परदेशी, राजू शिंदे, दत्ता गोर्डे, महिला आघाडी जिल्हा संघटिका आशा दातार व युवासेना युवा जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिरसाटांच्या गुलामीसाठी शिवसेना सोडली – खैरे
तुटकळ पैशांच्या अमिषापोटी काही पदाधिकाऱ्यांनी आपले इमान गद्दार गटाच्या हाती विकले आहे. दोन वेळेस एकाच घरात संभाजीनगरसारख्या महत्त्वपूर्ण महानगरपालिकेचे महापौर पद दिलेल्या माजी महापौराने शिवसेनेशी गद्दारी केली. मंत्री संजय शिरसाट यांची गुलामी करण्यासाठी या महापौराने शिवसेना सोडली असल्याची टीका करत शिवसेना सोडणाऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे सांगत पक्षांतर करणाऱ्याचा चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत वाटलेला पैसा कुठून आणला? असा प्रश्न देखील खैरे यांनी यावेळी उपस्थित केला. काय म्हणाले अंबादास दानवे?
शिवसैनिकांनी परिपक्वतेने खोट्या पक्षांतराच्या बातम्या समजून घेतल्या पाहिजे, माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सर्वसामान्य शिवसैनिकांपासून ते मोठमोठ्याल्या पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करण्याची हिंमत कोणीच करु शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत शिवसेनेशी गद्दारी केलेले लोक मुख्यमंत्री झाले. परंतू जनमानसात त्यांना कधीच सन्मान मिळू शकणार नाही, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले. आता संघाचे लोक घरोघरी जातील का?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हिंदुत्व सोडल्याचे एक तरी उदाहरण दाखवावे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देशातील प्रथम असे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी राज्याच्या विधान भवनात हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या प्रचारासाठी घरोघरी गेले. विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता ते जातील का? हे बघावे. संघाचे लोक आता थेट पुढच्या विधानसभा निवडणुकीला बाहेर येतील, अशी भूमिका दानवे यांनी यावेळी मांडली. सत्ताधारी एकमेकांचेच पाय ओढणार – उदयसिंग राजपूत
शिंदे गटाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आर्थिक अमिषापोटी पदाधिकारी शिवसेनेला सोडून जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसे मोठे केले आहे. मात्र, गद्दार गटाने ही जाणीव कधीच ठेवली नाही. आगामी काळात सत्ताधारी एकमेकांचेच पाय ओढणार असल्याची, भावना उदयसिंग राजपूत यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, कृष्णा पाटील डोणगावकर, अविनाश पाटील, अशोक शिंदे, लक्ष्मण सांगळे,अंकुश सुंभ, विठ्ठल बदर, संतोष जेजुरकर, शिवा लुंगारे, आनंद तांदुळवाडीकर, अरविंद धिवर, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, शहर संघटक सचिन तायडे, तालुकाप्रमुख संजय मोटे यांसह सर्व उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे आजी माजी लोक्रतिनिधी व महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.