मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक जीआर काढला. तो म्हणजे, थेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा आणखी रूंदावली आहे. अधिकाऱ्यांसह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर २०२३ रोजी नऊ कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. यातील काही कंपन्या राज्याबाहेरील आहेत. राज्यात आरक्षणाची लढाई जोर धरत असताना थेट आरक्षणाला कात्री लावण्यात आली आहे. यामुळे यावरून नवा वाद पेटला आहे. राज्य सरकारने एवढा मोठा निर्णय घेतल्याने विरोधी पक्षातून टीकची झोड उठत आहे. प्रत्येक स्तरातून सरकारावर टीका होत आहे. रोहित पवार यांनीही सरकारविरोधात आघाडी उघडून कंत्राटी धोरणाला कडाडून विरोध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.
एखाद्या कंपनीने शासनाला कंत्राटी नोकरदार पुरवठा केला तर शासनाने त्या कंपनीला सर्विस चार्ज किती द्यायला पाहिजे? आपले सिरियस आणि काटकसर करणारं सरकार खाजगी कंपन्यांना १५ % सर्व्हिस चार्ज देतं. एखाद्या कंत्राटी नोकरदाराला १०००० रुपये शासन देणार असेल तर त्यापैकी कंपनीला १५०० रु द्यावे लागतील, म्हणजे महिनाभर काम करायचे पोरांनी आणि कंपनी वाल्यांनी फुकटात दलाली खायची. समजा शासनाने वर्षभरात १०००० कोटीचे पगार केले तर १५०० कोटी खाजगी कंपन्यांना जातील. हे कुठलं गणित आहे? आणि ही कुठली काटकसर आहे?
दोन चार लोकांच्या खाजगी कंपन्यांना लाभ देण्यासाठी शासकीय खर्च बचतीच्या नावाखाली शासनाने युवकांच्या आयुष्याशी खेळू नये. शासन हे खाजगी कंपन्यांच्या नफ्यासाठी नसावे तर कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेवर आधारलेले असावे, त्यामुळे शासनाने हा जीआर त्वरित रद्द करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय : अजित पवार