मुंबई: भारत आणि न्यूझीलंड आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकात सलग दुसऱ्यांदा दोन्ही संघ उपांत्य फेरीसाठी आमनेसामने आहेत. २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टक्कर झाली होती.

भारतीय क्रिकेट संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी वाटचाल करत आहे. टीम इंडियाने लीग टप्प्यातील सर्व ९ सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर लय गमावून उपांत्य फेरीत धडक मारण्यात यश मिळविले. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी वानखेडेची खेळपट्टी कशी असेल ते जाणून घेऊया.

भारत विरुद्ध न्यूझीलंड पिच रिपोर्ट

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य मानली जाते. फलंदाजी अनुकूल असल्यामुळे या मैदानावर अनेक चौकार-षटकार मारले जातात. खेळपट्टीवरील उसळीमुळे चेंडू बॅटवर येऊन व्यवस्थित आदळतो. गोलंदाजीत फारशी मदत मिळत नाही. लाल मातीच्या या खेळपट्टीवर फिरकीपटूंना नक्कीच मदत मिळते. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांनाही सुरुवातीला नवीन चेंडूचा फायदा होतो.

या मैदानाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, येथे एकूण ३२ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १७ प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि १५ सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ निश्चितपणे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. पहिल्या डावातील वनडेतील सरासरी स्कोअर २४३ आणि दुसऱ्या डावातील २०१ आहे. मुंबईत आतापर्यंत तीन विश्वचषकाचे सामने झाले असून तिन्ही सामने उच्च स्कोअरिंगचे ठरले आहेत.

टीम इंडिया विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध सामना खेळण्यासाठी येथे आली होती. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३५७ धावा केल्या. तर श्रीलंकेचा संघ केवळ ५५ धावांवरच मर्यादित राहिला. अशा स्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा पहिला उपांत्य फेरीचा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

पुणेरी पगडी घालून आजोबांचा भारतीय टीमला फुल्ल सपोर्ट!

संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड-
डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *