रेल्वे थांबवण्यासाठी लाल झेंडा घेऊन ट्रॅकमन धावला 400 मी:धामणगाव रेल्वेस्थानकानजीक रेल्वे ट्रॅकचे वेल्डिंग उखडले
धामणगाव रेल्वेस्थानकाच्या पुढे डाऊन (बडनेरा ते नागपूर) बाजूला असलेल्या पोल क्र. ७०९ -० ते ७१२ -० दरम्यान रेल्वे ट्रॅकमधील वेल्डिंग उखडल्याचे गुरुवारी ट्रॅकमनच्या लक्षात आले. त्याच वेळी अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस सुसाट येत असल्याचे दिसल्याने ट्रॅकमनने लगेच लाल झेंडा हाती घेत समोरून येणाऱ्या रेल्वेच्या दिशेने धाव घेत ४०० मी. आधीच एक्स्प्रेस थांबवली. ट्रॅकमनच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला. त्याच्या समयसूचकतेचे कौतुक होत आहे. धामणगाव रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या गौरक्षणकडील संतोषी माता मंदिराजवळ पोल क्र.७०९-० ते ७१२-० दरम्यान डाऊन लाइन मधील किमी ७१० च्या २६२८ मध्ये रेल्वे रुळावरील वेल्डिंग उखडल्याने १ इंचाची भेग पडली होती. सकाळी रुळाला भेग पडल्याचे तपासणी करणारे ट्रॅकमन भोलराम मीणा यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी वरिष्ठांच्या कानी घातली. मात्र काही क्षणांत अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस येत असल्याचे त्यांना दिसले. ट्रॅकमन मीणा यांनी क्षणाचाही विलंब न लावता लाल झेंडा हाती घेऊन रेल्वेच्या दिशेने धावणे सुरू केले. रुळाला भेग असलेल्या ठिकाणापासून ४०० मी. आधीच गाडीला झेंडा दाखवून अहमदाबाद – पुरी एक्स्प्रेस रोखली. मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रेल्वे प्रशासनाने लगेच ट्रॅक दुरुस्त करण्याचे कार्य सुरू केले. रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला. तोवर अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस खोळंबली. त्यामागे मुंबई-हावडा मेलही रेल्वेस्थानकावर उभी करण्यात आली होती. रेल्वे रुळाला भेग दिसताच लाल झेंडा घेऊन धावत सुटलो मी ७०९ ते ७१२ पोलजवळ गस्त घालत होतो. ‘डाऊन’ ट्रॅकवर मला ७१० जवळ रेल्वे रुळाला एका ठिकाणी भेग असल्याचे लक्षात आले. त्याच वेळी बडनेराकडून नागपूरच्या दिशेने अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस येत होती. विशेष म्हणजे, या रेल्वेला धामणगाव रेल्वेस्थानकावर थांबा नाही. त्यामुळे रेल्वेचे गती सुसाट होती. रेल्वे येताना दिसताच मी तत्काळ रेल्वेच्या दिशेने धावत सुटलो, त्या वेळी माझ्या हातात लाल झेंडा होता. तो झेंडा चालकाला दिसताच त्याने रेल्वेचे ब्रेक लावले.