उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे आपसात उडाले खटके:सुषमा अंधारे-अंबादास दानवेंमधील वादाचा VIDEO व्हायरल, शिवसेनेचीही टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाला असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यात येत आहे. पुरंदर येथे विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते पुरंदर येथे गेले होते. या दरम्यान हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे हे दोघे एकमेकांना उद्देशून बोलत असल्याचे दिसून येत आहे. ज्या कामासाठी आले आधी ते काम करा, असे सुषमा अंधारे अंबादास दानवे यांना सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे आता सत्ताधारी पक्षाच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या वतीने यावरून ठाकरे गटातील नेत्यांमधील मतभेद समोर आले असल्याचे म्हटले गेले आहे. इतकेच नाही तर ठाकरे गटात महिला नेत्यांचा कसा अपमान केला जातो, हे देखील उघड झाले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. दोन नेत्यांचे आपापसातच टोमणे आणि वाद – शिवसेना या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यात आली. एका पोस्टमध्ये शिवसेनेने म्हटले की, ‘पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला गेलेले उबाठा नेते अंबादास दानवे आणि नेत्या सुषमा अंधारे यांच्यात जोरदार खटके उडाले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्याऐवजी या दोन नेत्यांचे आपापसातच टोमणे आणि वाद सुरू झाले. यावरून उबाठा गटातील नेत्यांमधील मतभेद समोर आलेच. परंतु उबाठा गटातील महिला नेत्यांचा कसा अपमान केला जातो, हे देखील पुन्हा एकदा उघड झाले. यांची लढाई महाराष्ट्र हितासाठी नाहीच तर वर्चस्वाची आणि श्रेयवादाची आहे, हे आज स्पष्ट झाले.’