मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shivaji Park Dasera Melava) घेण्यास यंदा मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं भाषण नेमकं कुठे होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एक फोटो ट्वीट करत दसरा मेळाव्याबाबत सूचक संकेत दिले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेही आपल्या गाडीवर उभं राहून दसरा मेळाव्याचं भाषण करणार का? असा सवाल विचारला जात आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेब एका गाडीच्या बोनेटवर उभं राहून भाषण करताना दिसत आहेत. त्यांच्याभोवती अनेक श्रोत्यांची गर्दी जमल्याचं पाहायला मिळतं “आतुरता दसरा मेळाव्याची… पुनरावृत्ती होणार… #जात_गोत्र_धर्म #शिवसेना” असं कॅप्शन किशोरी यांनी या फोटोला दिलं आहे.

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वीच बाळासाहेबांच्या एका जुन्या भाषणाची आठवण सांगितली होती. त्यात त्यांनी गाडीच्या बोनेटवर उभं राहून बाळासाहेबांनी केलेल्या भाषणाचा किस्सा सांगितला होता. आता किशोरी पेडणेकरांनी हा फोटो ट्वीट करत ‘पुनरावृत्ती’चे संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेही कारवर उभं राहून भाषण करणार का, अशी कुजबूज सुरु झाली आहे.

हेही वाचा : सोमय्या बिनकामाचे, फक्त बेंबीच्या देठापासून ओरडून आरोप करतात, रुपाली पाटलांकडून समाचार

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी परिसरातच कारवर उभं राहून भाषण करण्याचा निर्धार केला, तर शिवसैनिकांना एक भावनिक संदेश मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. अन्यथा गोरेगावातील नेस्को संकुलातील मैदान, षण्मुखानंद सभागृह यासारखे पर्यायही ठाकरेंसमोर आहेत.

दरम्यान, शिवाजी पार्कच्या मैदानावर मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे अर्ज शिवसेनेतील दोन गटांकडून दाखल करण्यात आले होते. मात्र कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हेही वाचा : काल मी ताई होते, आज बाई झाले, उद्धव साहेबांच्या वक्तव्याने हृदय दुखलं : भावना गवळीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.