उद्धव ठाकरे एक दिवस देश सोडून जातील:त्यांना पापाचे प्रायश्चित भोगावेच लागेल, शिंदेंचे कौतुक करत शिवसेनेच्या बड्या नेत्याची टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एकेदिवशी हा देश सोडून जाण्याची वेळ येईल, अशी टीका शिवसेनेचे बडे नेते रामदास कदम यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आलेली महाविकास आघाडी यावेळी रडीचा डाव खेळत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. रामदास कदम यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासह साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे मध्यरात्री 2 वा. आपल्या कुटुंबासह देश सोडून निघून जातील. हे माझे शब्द तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले, त्याचे प्रायश्चित त्यांना भोगावेच लागेल. आम्ही भाजपकडे काय व किती मागावे? यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची इच्छा व्यक्त करत भाजप श्रेष्ठींचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचेही नमूद केले. ते म्हणाले, साईबाबांनी महायुतीला कौल दिला आहे. पुढील 2 दिवसांत राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात येईल. महाराष्ट्रातील जनतेने मागील अडीच वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या रुपात सलग 18 ते 20 तास काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. मागच्या वेळी शिवसेनेचे संख्याबळ कमी असतानाही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला संधी दिली. आता भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवण्याची गरज आहे. आम्हा सर्वांचीच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे. पण भाजपलाही त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. महायुती म्हणून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ईव्हीएमवरून विरोधी पक्षांवर साधला निशाणा रामदास कदम यांनी ईव्हीएमच्या डोक्यावर पराभवाचे खापर फोडणाऱ्या विरोधकांवरही निशाणा साधला. विरोधी पक्षांना लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यांचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते. तेव्हा त्यांनी ईव्हीएमवर खापर फोडले नाही. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ते ईव्हीएमला दोष देत आहेत. पराभवाचे खापर फोडण्यासाठी त्यांना काहीतरी कारण हवे होते. आपल्या बाजूने निकाल लागली की ईव्हीएम चांगली आणि विरोधात निकाल लागला की वाईट असा प्रकार ते करत आहेत, असे ते म्हणाले. हे ही वाचा… देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अडले घोडे?:विनोद तावडेंनी अमित शहांना दिलेल्या ‘फिडबॅक’मुळे अडचण, BJP नवा चेहरा देणार का? मुंबई – महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. पण आता चित्र काहीसे बदलल्याची स्थिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला महाराष्ट्रातील जातीय समीकरण साधायचे आहे. मराठा आरक्षणात भाजपचे हात पोळलेत. त्यामुळे हा भगवा पक्ष फडणवीस यांच्या नावावर अत्यंत सावधपणे पुढे जात आहे. वाचा सविस्तर