मुंबई : दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेला दसरा मेळावा, त्यावरुन सुरु असलेला ‘सामना’, शिंदे गटाशी घेतलेला पंगा, आगामी मुंबई महापालिका निवडणुका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज गोरेगावच्या नेस्को मैदानावर सभा होत आहे. थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सभास्थळी असलेला विचारमंच आणि तेथील खुर्च्यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. त्याचं कारणही तसंच आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात आहेत. पण तरीही त्यांच्या नावाची खुर्ची शिवसेनेच्या मंचावर ठेवण्यात आलेली आहे. तुरुंगात असूनही राऊतांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आल्याने सभास्थळी संजय राऊतांची अनेक शिवसैनिकांना आठवण झाली.

शिवसेनेचा दसरा मेळावा तोंडावर आला आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे दसरा मेळाव्याकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी आज गोरेगाव येथून शिवसेनेचा शंखनाद घुमणार आहे. गोरेगावच्या नेस्को संकुलात गटप्रमुखांचा विराट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. थोड्याच वेळात या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करतील. शिवसेना नेत्यांना बसण्यासाठी मंचावर खास खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लीलाधर डाके, अनंत गीते, भास्कर जाधव, अरविंद सावंत यांच्याबरोबरच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासाठीही खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे. राऊत तुरुंगात असले तरी त्यांच्या नावाची खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा!

दसरा मेळावा असो वा उद्धव ठाकरेंचं शिवसेनेच्या व्यासपीठावरचं कोणतंही सार्वजनिक भाषण… त्याआधी संजय राऊतांचं हमखास भाषण असायचं. उद्धव ठाकरे सभेत काय बोलू शकतात, हे अगोदरच संजय राऊत आपल्या खास स्टाईलमध्ये सांगायचे. मात्र यावेळी असं पहिल्यांदा होईल, ज्या सभेत संजय राऊत नसतील. उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊतांचं स्थान हे कवी अनंत राऊत यांनी लिहिलेल्या कवितेप्रमाणे ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ असंच होतं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गेली ३५ वर्ष खास मित्रत्वाचं नातं आहे. अनेक कार्यक्रमांमधून, सार्वजनिक व्यासपीठांवरुन दोघांनीही आपल्या मैत्रीच्या नात्याला आणि आठवणींना अनेक वेळा उजाळा दिलाय. पण सध्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघे मित्रही अडचणीत आहेत. शिवसेना पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अस्तित्वाची लढाई लढायला लावली आहे. तर पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून संजय राऊत तुरुंगात आहेत. जामीन मिळावा म्हणून ते अटोकाट प्रयत्न करतायेत.

राऊतांनी यंदा राज्यसभेवर जाण्याचा चौकार मारला. शिवसेनेकडून सलग चारवेळा राज्यसभेवर जाण्याचा बहुमान राऊतांच्या नावावर आहे. तत्पूर्वी २०१९ साली मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट आलं आणि सेनेने भाजपशी काडीमोड घेतला. शिवसेनेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संसार जुळविण्यात राऊतांनी खूपच महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान गेली अडीच वर्ष सातत्याने राऊत भाजपविरोधात भूमिका मांडत राहिले. दररोज सकाळच्या पत्रकार परिषदांमधून भाजपला ललकारत राहिले. पण ठाकरेंचं सरकार पायउतार होताच अन् राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार येताच काहीच दिवसांत राऊतांना अटक झाली. उद्धव ठाकरेंचाही गेल्या काही दिवसांपासून पक्ष वाचविण्याासाठी संघर्ष सुरु आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.