उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसणार:मुंबईतील अनेक माजी नगरसेवक नाराज; पक्षावर रोष व्यक्त करत भाजपच्या वाटेवर असण्याचा अंदाज
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीत आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या तयारीसाठी मातोश्री या ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला पक्षाकडून विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप या माजी नगरसेवकांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लोकसभा, विधानसभेत विश्वासात घेतले नाही मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकींमध्ये माजी नगरसेवकांना बोलावले जात नसल्याची तक्रार यांनी माजी नगरसेवकांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नव्हते, अशी स्पष्ट तक्रार एका माजी नगरसेवकाने या बैठकीत केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांमधील ही नाराजी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील दिसून येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक नेत्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षात परत येण्याचे वेध
विधानसभा निवडणूकमध्ये भारतीय जनता पक्षाची साथ सोडलेल्या अनेक नेत्यांना आता पुन्हा भारतीय जनता पक्षात परत येण्यासाठी वेध लागले आहेत. तिकीट मिळवण्यासाठी भाजप सोडून इतर पक्षात गेलेले अनेक नेते पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. मात्र या नेत्यांना पुन्हा भाजपमध्ये परत प्रवेश द्यायचा का? याबाबत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले संजय काका पाटील हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये परत येण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.